breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मोदींच्या सुरक्षेत त्रुटी? पंजाब सरकारचं भाजपाला प्रत्युत्तर; मुख्यमंत्री चन्नी म्हणाले…!

नवी दिल्ली |

कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पंजाब दौऱ्यावर गेले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना त्यांचा दौरा अर्धवट सोडून परत दिल्लीला परतावं लागलं. भाजपाकडून या मुद्द्यावरून पंजाबमधील काँग्रेसशासित सरकारला लक्ष्य केलं जात असताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी देखील भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान एका आंदोलनामुळे पंजाबमधल्या एका फ्लायओव्हरवर त्यांच्या सर्व सुरक्षा आणि गाड्यांच्या ताफ्यासह जवळपास १५ ते २० मिनिटे अडकून पडल्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

  • नेमकं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर होते. ते सकाळी विमानाने भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण खराब हवामानामुळे काही काळ वाट पाहूनही हेलिकॉप्टरने जाणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी अखेर गाडीनेच हुसैनीवालाला जायचा निर्णय घेतला. या दोन तासाच्या प्रवासात हुसैनीवालापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा अडकला कारण पुढे काही आंदोलक आंदोलन करत होते. २० मिनिटे थांबल्यानंतर अखेर पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करून दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजपाकडून पंजाबमधील काँग्रेसशासित सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. खुद्द पंतप्रधानांच्याच सुरक्षेत कसूर ठेवल्याचा आरोप केंद्र सरकारने पंजाब सरकारवर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकारावर पंजाब सरकारकडे खुलासा देखील मागितला आहे. यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर राहिलेली नाही. पंतप्रधानांनी शेवटच्या क्षणी गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. ते हेलिकॉप्टरने जाणार असल्याचं नियोजन होतं”, असं चन्नी म्हणाले आहेत. “फिरोजपूर जिल्ह्यातून पंतप्रधानांना त्यांचा दौरा अर्धवट सोडून परत जावं लागलं याविषयी मी खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मी भटिंडाला जाणं अपेक्षित होतं. पण माझ्यासोबत असलेल्यांपैकी काहीजण करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे मी पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी जाऊ शकलो नाही. आम्ही पंतप्रधान कार्यालयाला कळवलं होतं की तुम्ही हा दौरा रद्द करावा. कारण वातावरण आणि आंदोलकांचा मुद्दा होता. त्यांनी अचाकन त्यांच्या मार्गामध्ये बदल केल्याची माहिती आमच्याकडे नव्हती”, असं चरणजीतसिंग चन्नी म्हणाले.

  • प्रचारसभेत लोकं न आल्यानंच दौरा केला रद्द?

दरम्यान, पंजाब कॅबिनेटमधले मंत्री राजकुमार विर्का यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये कोणतीही कसूर झालेली नाही. यासंदर्भात करण्यात येणारे आरोप निराधार आहेत. यातलं सत्य हे आहे की भाजपाची प्रचारसभा फ्लॉप झाली होती. जेव्हा पंतप्रधानांना हे समजलं, तेव्हा त्यांनी दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला”, असं विर्का म्हणाले. पंतप्रधानांच्या नियोजित रॅलीमध्ये ७० हजार लोक येण्याचा अंदाज असताना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानेच असे आरोप केले जात असल्याचं पंजाब काँग्रेसकडून सांगितलं जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button