Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सीरिअल पुढे चालवायची म्हणून नराधमांना पाठिशी घालणं चुकीचं – प्राजक्ता गायकवाड

मुंबई – सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेतून प्राजक्ता गायकवाडला काढण्यात आले असून आता तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप दिसणार आहे. प्राजक्ताच्या गैरवर्तणूकीमुळे तिला मालिकेतून काढूण टाकण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे, मात्र आता स्वतः प्राजक्ताने या सर्व आरोपांवर तिची बाजू मांडली असून ‘मला मालिकेतून काढून टाकले नाही तर मी स्वत: मालिका सोडली आहे’, असे स्पष्ट केले आहे.

एका मुलाखतीत मालिका सोडण्याचे मुख्य कारण सांगताना प्राजक्ता म्हणाली, ‘मालिकेच्या सेटवरील जवळपास २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. गावकऱ्यांनी अडवल्यामुळे शूटिंग थांबवली गेली. त्यानंतर मुंबईला शूटिंग करायचं ठरवलं. मी पुण्यातून साताऱ्याला गेले, तेव्हा तुझ्यासोबत विवेक सांगळेसुद्धा येणार आहे, असे सांगण्यात आले. आम्ही एकाच गाडीने प्रवास करणार होतो. दोन तास तो उशिरा आला, त्याचं कारण विचारल्यावर त्याने सांगितलं जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून येतोय. साहजिकच अख्खं जग एवढी काळजी घेत असताना त्या व्यक्तीसोबत मी सातारा ते मुंबई इतका प्रवास कसा करणार? मी प्रश्न विचारला तर त्याने मला शिव्या दिल्या. तुला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असेल पण मी नाही घेणार म्हणत त्याने शिवीगाळ केली. ही घटना मी अलकाताईंच्या कानावर दोन-तीन वेळा घातली. त्यांनी फक्त मी बघते असं उत्तर दिलं. त्यांच्याकडून या घटनेची दखल घेतली गेली नाही. त्या स्वत: स्त्री आहेत, त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मुलींच्या बाबतीत अशी घटना घडली असती तर मला खात्री आहे की त्या गप्प बसल्या नसत्या. विवेक सांगळे ही व्यक्ती समोर आली तरी मला शिवीगाळची घटना आठवते. त्याच्यामुळे खरंतर मी मालिका सोडली’, असे प्राजक्ताने सांगितले. त्याचबरोबर ‘शिवीगाळच्या घटनेनंतरही मी दीड महिना शूटिंग केलं. एक सॉरी जरी म्हटलं तरी मी विचार केला असता पण त्याने माफी मागितलीच नाही. निर्मात्या आणि एक स्त्री म्हणून अलकाताईंनी या प्रकरणाची दखल घेण्याची गरज होती. तुम्हाला सीरिअल पुढे चालवायची आहे म्हणून तुम्ही अशा नराधमांना पाठिशी घालता, हे चुकीचं आहे’, असेही प्राजक्ता म्हणाली.

मालिकेच्या निर्मात्या आणि काळुबाईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता अनेकदा परीक्षेचं कारण सांगून अचानक सुट्टी घ्यायची, असे म्हटले होते. त्यावर बोलताना ‘मी प्रोजेक्ट घेतानाच सांगितलं होतं की मला इंजिनीअरिंगची परीक्षा द्यायची आहे. ज्या परीक्षा मे-जूनमध्ये होणार होत्या, त्या कोरोनामुळे आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतल्या गेल्या. शूटिंगला जेव्हा पुन्हा सुरुवात झाली तेव्हाच नेमक्या माझ्या परीक्षा आल्या. मला वाहिनीकडून सांगण्यात आलं की तू परीक्षेला गेलीस तर मालिका थांबवावी लागेल. माझ्यामुळे मालिकेचं नुकसान होऊ नये म्हणून मी परीक्षा दिली नाही.’

तसेच सेटवर उशिरा येण्याच्या आरोपांवर तिने सांगितले, ‘मी सेटवर उशिरा येण्याचा प्रश्नच नव्हता कारण जिथे आम्ही राहत होतो तिथेच शूटिंग सुरू होती. जी रुम मला दिली गेली होती, तिथेच शूटिंग व्हायचं. मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी अशी काही वेगळी रुम नव्हती. ओपन स्पेसमध्ये मेकअप करत होतो.’

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button