“किक 2’मध्ये झळकणार दिशा पाटनी

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिने “एम एस धोनी’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर “बागी 2’मध्ये तिने केलेल्या अभिनयाची सर्वांनी स्तुती केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. दिशा सध्या सलमानसोबत “भारत’मध्ये काम करत असून तिला आणखी एक चित्रपट मिळाल्याचे समजते. ती सलमानसोबत “किक’च्या सीक्वलमध्ये झळकणार आहे.
26 वर्षीय दिशा बॉलिवूडमधील क्यूट ऍण्ड यंग अभिनेत्रीपैकी एक आहे. दिशा सध्या अली अब्बास जफरच्या “भारत’ चित्रपटाचे शुटिंग करत आहे. तसेच काही दिवसांपासून साजिद नाडियावालासोबत ती दिसली होती. त्यामुळे “किक-2’मध्ये दिशा निश्चित मानली जात आहे. मात्र, साजिद नाडियावालाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. पण या चित्रपटातील अभिनेत्रीसाठीच्या शर्यतीत दिशाचे नाव आघाडीवर आहे.
2014मध्ये प्रदर्शित झालेला “किक’ चित्रपट हिट ठरला होता. या यशानंतर चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची चर्चा सुरू झाली. चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी सलमान निश्चित असून अभिनेत्री अद्याप निश्चित झाली नाही. “किक’मध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि सलमान खानची जोडी होती. आता “किक-2’मध्ये दिशा पाटनीला रिप्लेस करण्यात आले आहे.