ताज्या घडामोडीमुंबई

महागाईनंतर सामान्य नागरिकांना विजेचे चटके; मागणी वाढत असताना कोळसा टंचाई आणि महागडी खरेदी

मुंबई  | प्रतिनिधी 

पेट्रोल-डिझेलचे दर चिंता वाढवत असल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती आहे. अशातच आता सामान्य नागरिकांना विजेचे चटकेही सोसावे लागण्याची शक्यता आहे. विजेची मागणी वाढत असल्याने राज्यात वीजखरेदीचा खर्च वाढला आहे. त्यातच कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती घटली असून, महावितरणला बाहेरून वीजखरेदी करावी लागत आहे. त्यामुळे महावितरणला सव्वा कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च दररोज करावा लागत आहे.

सध्या उन्हाचा पारा चढतच असून, उकाड्याचा सामना करण्यासाठी राज्यभरातील ग्राहकांकडून वीजवापर वाढला आहे. मुंबईसह राज्याचा वीजवापर २८ हजार मेगावॉटच्या घरात गेला आहे. वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी वितरण कंपन्यांना उपलब्धता वाढवावी लागत आहे. या स्थितीत कोळसा संकटामुळे महानिर्मितीकडून कमी वीज उत्पादन होत असल्याने मुंबई वगळून सर्वत्र वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणची स्थिती अधिक भीषण झाली आहे. त्यातूनच सध्या महागडी वीज खरेदी करावी लागत आहे.

राज्यातील २.७३ कोटी ग्राहकांना सध्या दररोज सरासरी २३ हजार ६०० ते २४ हजार मेगावॉट वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीला सर्वाधिक वीज कोळशावर आधारित विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडूनच खरेदी करावी लागते. त्यामध्ये अधिकाधिक वीज महानिर्मितीकडून खरेदी केली जाते. महानिर्मितीची वीज उत्पादन क्षमता नऊ हजार मेगावॉटहून अधिक आहे. मात्र, कोळसा टंचाईमुळे कंपनी सध्या जेमतेम सहा हजार मेगावॉट वीज निर्मितीच करू शकत आहे. महावितरण एनटीपीसी व काही खासगी औष्णिक वीज उत्पादकांकडूनही वीज खरेदी करते. मात्र, सर्वच प्रकल्पांत कोळसा टंचाई असल्याने महावितरणला केवळ १५ हजार ५५० मेगावॉटच वीज उपलब्ध होत आहे. उर्वरित नऊ हजार मेगावॉट वीज उपलब्ध करताना तारेवरची कसरत होत आहे. कंपनीकडून सध्या दररोज सुमारे दोन हजार मेगावॉट (सुमारे २० लाख युनिट) वीज खुल्या बाजारातून खरेदी केली जात आहे. इतर राज्यांमध्येही सध्या विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी खुल्या बाजारातील विजेचे दर वाढून सरासरी ११ रुपये प्रतियुनिट इतका दर द्यावा लागत आहे. त्यापोटी महावितरणला दररोज सव्वा कोटी रुपये अतिरिक्त खर्च येत आहे.

कोळसा येण्यास विलंब होणार

महावितरण सर्वाधिक प्रमाणात वीजखरेदी करणाऱ्या महानिर्मिती कंपनीच्या वीज प्रकल्पांमध्ये सध्या कोळशाची स्थिती टंचाई स्तरावर आहे. राज्यभरातील एकूण आठ वीजनिर्मिती संचासाठी नियमानुसार १.३८ लाख टन कोळशाची गरज असते. सद्यस्थितीत या आठ संचांमध्ये मिळून सध्या ६.४९ लाख टन कोळसा आहे. त्यातील वीज निर्मितीसाठी वापरयोग्य कोळसा साठा फक्त ३१ हजार १४३ लाख टन आहे. ८० हजार १४० टन कोळसा कच्च्या स्वरूपात वीज प्रकल्पात आहे. ८५ हजार १५५ लाख टन कच्चा कोळसा मागविण्यात आला आहे. तर, ३४ हजार ४११ टन कोळसा स्वच्छ करून मागविण्यात आला आहे. हा सर्व कोळसा वीज प्रकल्पांत येण्यास विलंब होणार आहे. त्यानुसार सरासरी जेमतेम तीन दिवस पुरेल इतका कोळसा साठाच महानिर्मितीच्या वीज प्रकल्पांमध्ये शिल्लक आहे.

पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने घसरत आहेत. मल्टि कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमती ४५० रुपयांनी घसरून प्रति बॅरल ८,१२० रुपयांवर गेल्या. तरीही मंगळवारी सलग आठव्या दिवशी देशांतर्गत इंधनाच्या किंमतीत सातव्यांदा वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटर किंमतीत ८० पैसे आणि ७० पैशांची वाढ झाली. मुंबईमध्ये पेट्रोल ११५.०२ रुपयांवर तर डिझेल ९९.२३ रुपयांवर गेले आहे. राज्यात परभणीत सर्वाधिक इंधन दर असून डिझेल घेण्यासाठी १००.७० रुपये तर पेट्रोलसाठी ११८.०७ रुपये मोजावे लागणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button