नाशिकमधील १५ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर
नाशिक – राज्यातील सहकार खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील २३ ऑक्टोबरपूर्वी मुदत संपणाऱ्या १५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढील वर्षी घेतल्या जाणार आहेत. यासाठी मतदार याद्या आणि निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून १७ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, नांदगाव, लासलगाव, मनमाड, चांदवड, येवला, उमराणे, देवळा, कळवण, घोटी, दिंडोरी, सिन्नर सुरगाणा आणि मालेगाव या १५ बाजार समित्यांची मुदत २३ ऑक्टोबरपूर्वी संपणार आहे. तर जिह्यातील उर्वरित बागलाण व नामपूर बाजार समितीच्या वाद न्यायालयात रखडला आहे. त्यामुळे १५ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, १० नोव्हेंबला मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची सूचना दिली जाणार असून अंतिम मतदार यादी ६ डिसेंबरला जाहीर केली जाईल. त्यानंतर १६ डिसेंबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू होईल. ७ जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून १७ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावेळी सरकारमधील भागीदार असलेल्या शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या निवडणुकीत सहभागी करून घेणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.