Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिवसेना हा मूळ पक्ष आपल्या गटाकडे ठेवण्याचे एकनाथ शिंदेंचे प्रयत्न

मुंबई: भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करायचे की नाही; तसेच ते कशा पद्धतीने करायचे यापेक्षा शिवेसना हा मूळ पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाकडे कसे येईल, यासाठीच्या कायदेशीर लढाईवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे या कायदेशीर लढाईसाठी भाजपच्या कायदे पंडितांची मोठी फौजही त्यांच्यासोबत असल्याचे समजते. यामध्ये शिंदे यांना सहजासहजी यश मिळणे कठीण असले तरी या मुद्यावरून संपूर्ण शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठीच पुढचे काही दिवस त्यांच्याकडून कायदेशीर लढाई लढली जाणार असल्याचे समजते.

शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवून तिथे आमदार अजय चौधरी यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर शिंदे यांनी तातडीने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र पाठवून अशा प्रकारची कारवाई बेकायदा असल्याचे सांगितले. ३४ आमदारांच्या सह्या घेऊन त्यांनी मुख्य पक्ष प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदाबरोबरच शिवसेना हा मूळ पक्ष आपल्याकडेच कसा राहील; तसेच पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हदेखील आपल्याकडेच राहील यासाठीही त्यांनी कायदेशीर कारवाईची रणनीती आखायला सुरुवात केल्याचे समजते.

शिवसेना हा मूळ पक्ष आपल्याकडे गटाकडे राहिल्यास, बंडखोर आमदार गद्दार नसून ते मूळ शिवसैनिक आहेत, अशाप्रकारचा दावा त्यांना करता येणार आहे. त्यासाठीच ते वारंवार आम्ही हिंदुत्वाच्या वाटेवर चालतोय, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत, अशी विधाने करीत आहेत. शिवसेना पक्षावरच दावा करण्यासाठी त्यांना भाजपच्या कायदेशीर जाणकारांची मोठ्या प्रमाणावर मदत मिळत असल्याचे समजते. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगातील काही अधिकाऱ्यांची, विधिमंडळातील काही जुन्याजाणत्या अधिकाऱ्यांची; तसेच राजभवनमधील कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात असल्याचे समजते. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, योगेश कदम आणि चंद्रकांत पाटील हे आमदार गेल्या २४ तासांत फुटून बाहेर पडले आहेत. तर, काही आमदारांनी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गाफील ठेवायचे, त्यांची माहिती बेमालुमपणे शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवायची आणि ऐन वेळी परिस्थितीनुसार शिंदे यांच्या गटात उडी मारायची, अशा प्रकारचीही रणनीती ठरल्याचे समजते.

शिंदे यांचा दुजोरा

एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नसून, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आमदार फारकत घेणार नाहीत,’ असे सांगून त्यांनी एक प्रकारे या बातमीला दुजोराच दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button