breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘ईडी’चे आठ ठिकाणी छापे; पुण्यातील वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहारप्रकरणी दोघांची चौकशी

पुणे |

पुण्यातील वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी पुणे आणि औरंगाबाद येथील आठ ठिकाणांवर छापे टाकले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुण्यातून दोघांची ‘ईडी’च्या मुंबई कार्यालयात चौकशी करण्यात आली. पुण्यातील ताबुत इनाम इन्डोव्हमेंट ट्रस्टचा मालकीच्या सुमारे आठ हेक्टर जमिनीपैकी पाच हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमांतर्गत महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतली होती. ही ट्रस्ट वक्फअंतर्गत नोंदणीकृत आहे. जमिनीचा मोबदला घेण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने खोटी कागदपत्रे व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. त्यात वक्फ बोर्डच्या बनावट ना हरकत प्रमाणपत्राचाही समावेश होता. त्यासाठी बनावट अध्यक्ष व सचिव उभे करण्यात आले. त्याच्या साहाय्याने सात कोटी ७६ लाख ९८ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट स्वीकारला व ट्रस्टच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या खात्यात जमा करण्यात आला.

आरोपींनी ८ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ या कालावधीत ही फसवणूक केली. ट्रस्टला जमिनीची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांची तपासणी केली असता या रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात इम्तियाज शेख व चाँद मुलाणी यांच्याविरुद्ध १३ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पुण्यात सात ठिकाणी आणि औरंगाबाद येथे एका ठिकाणी ईडीने गुरुवारी छापे टाकले. या प्रकरणातील गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढण्यास आमचे प्राधान्य असून, त्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पुण्यातून दोघांना ईडीच्या मुंबईतील कार्यालयात आणण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मी मंत्रिपद स्वीकारल्यापासून अल्पसंख्याक विभाग व वक्फ बोर्डातील भ्रष्टाचारविरोधात कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील जमीनप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींना अटकही केली आहे. ‘ईडी’ने आता आधीच्या सरकारच्या काळातील वक्फ बोर्डाच्या कारभाराची आणि बोर्डाशी संबंधित ३० हजार संस्थांची चौकशी करून राज्य सरकारला सहकार्य करावे. – नवाब मलिक, अल्पसंख्याकमंत्री

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button