breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

‘ई-पीक’ पाहणी प्रकल्प देशासाठी आदर्शवत- बाळासाहेब थोरात

  • दोन ऑक्टोबरपासून ‘डिजिटल सातबारा’ घरपोच

संगमनेर |

महाविकास आघाडी सरकारमध्ये मागील दीड वर्षांपासून महसूल मंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर ऑनलाइन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह  दोन ऑक्टोबरपासून डिजिटल सातबारा घरपोच देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नव्याने सुरू केलेल्या ‘ई-पीक’ पाहणी प्रकल्प हा देशासाठी आदर्शवत असून शेतकऱ्यांसाठी नव्या युगाची सुरुवात ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

तालुक्यातील आनंदवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने ‘ई-पीक’ पाहणी योजनेत शंभर टक्के नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर. बी. रहाणे होते. महानंदा व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, जि. प. सभापती मिराताई शेटे, साहेबराव गडाख, अजय फटांगरे, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे,  तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार उमाकांत कडनर यांसह महसूल विभागाचे सर्कल, तलाठी व विविध कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी थोरात यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ‘ई-पीक’पाहणी केली .त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाइन डिजिटल सातबाराचे वितरणही करण्यात आले.

थोरात म्हणाले की, ‘ई-पीक’ पाहणी ही शेतकऱ्यांच्या जीवनात नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे. या योजनेमुळे सर्वांना स्वत:ची पीक पाहणी स्वत: नोंद करता येणार आहे. तसेच सध्या राज्यात, देशात कोणते पीक किती रोपण झाले आहे व कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आहे याची अद्ययावत माहिती सुद्धा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना देशासाठी आदर्शवत ठरणारी आहे. मागील दीड वर्षांपासून महसूल मंत्रिपदाच्या काळात आपण नव्याने ऑनलाइन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. यातून ऑनलाइन सातबारा ई—फेरफार शेतकऱ्यांना अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने मिळत आहेत. सातबारावरील अनावश्यक नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपासून सर्व शेतकऱ्यांना सातबारा घरपोच मिळणार आहे. संगमनेर तालुक्यात मागील वर्षी मॉडेल म्हणून या ‘ई-पीक’पाहणी अभियानाची सुरुवात केली. आणि आज संपूर्ण राज्यामध्ये ही पाहणी लागू करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली असून उर्वरित गावांमधील शेतकऱ्यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन थोरात यांनी केले.

प्रांतअधिकारी डॉ. मंगरूळे म्हणाले की, थोरात यांनी महसूल विभागाला आधुनिक व डिजिटल चेहरा दिला आहे. मागील मंत्रिपदाच्या काळात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवून त्यांनी या विभागाला आधुनिकता व गतिमानता दिली. तसेच आता नव्याने ई पीक पाहणी, डिजिटल सातबारा हे अत्यंत आदर्श उपक्रम देशाला दिले आहेत. १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या नव्या प्रकल्पामुळे शेतक ऱ्यांना खऱ्या अर्थाने शेती उत्पादनाबाबत माहितीची स्वायत्तता मिळणार आहे. लवकरच संपूर्ण तालुका ‘ई-पीक’ पाहणी नोंद शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातील सर्व कर्मचारी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र रहाणे यांनी केले तर आभार तहसीलदार अमोल निकम यांनी मानले.

सात गावांमध्ये १०० टक्के नोंद

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ई पीक पाहणी अभियानात संगमनेर तालुक्याततील सर्व नागरिकांनी मोठा सहभाग घेतला असून १७४ गावांपैकी आनंदवाडी, रणखांब, मांची, कोळवाडे, विद्यानगर, खांडगाव, खांडगेदरा या सात गावांमध्ये शंभर टक्के नोंदणी झाली आहे तर उर्वरित गावांमधील ८० टक्केपर्यंत पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button