breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

घराणेशाही : पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेत्यांच्या बुडाखाली अंधार!

पिंपरी: पिंपरी-चिंचवडचे राजकारण स्थानिक-बाहेरचा, गावकी-भावकी अशा मुद्दांवर होते, हे सर्वश्रृत आहे. गावकी-भावकीसह आता घराणेशाही हासुद्धा कळीचा मुद्दा ठरु लागला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळातून लोकसभा निवडणूक लढवली. यावेळी घराणेशाहीसह राजपूत्र आणि भूमिपूत्र अशा भाकडकथा चर्चेत आल्या, ही बाब राष्ट्रवादीसाठी कदापि परवडणारी नाही.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी भूमिपूत्र आणि राजपूत्र असा वाद निर्माण केला. पार्थ पवार यांचा पराभव झाला. पवार कुटुंबियांच्या इतिहासात पहिल्यांदा पराभव पचवावा लागला. कारण, काय तर स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांना आता राष्ट्रवादी किंवा पवार कुटुंबियांची घराणेशाही नको आहे. ज्या कुटुंबाने ५० ते ६० वर्षे समाजकार्यात घातली. लोकांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती नेतृत्व करणार असेल, तर त्याला साथ देण्याऐवजी घराणेशाहीच्या नावाखाली अवहेलना सहन करावी लागली. मात्र, स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनी उभा केलेले हे कुंभाड कितपत योग्य आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी घराणेशाही आणि राजकीय वारसा यावर चौफेर बोलताना किंवा पवार कुटुंबियांना लक्ष्य करताना त्यांचे सूपत्र विश्वजीत बारणे यांना महापालिका सभागृहात पाठवण्यासाठी सुरक्षित प्रभागाची धडपड सुरू केली होती, हे विसरता कामा नये.

पिंपरी आणि चिंचवड मतदार संघातून राष्ट्रवादीच्याच स्थानिक नेत्यांनी पार्थ पवारांचा विश्वासघात केला. पण, माजी शहराध्यक्ष संजोग वाघरे यांचे सूपूत्र ऋषिकेश वाघेरे, माजी महापौर योगेश बहल यांचे पुत्र विरेंद्र बहल, माजी महापौर मंगला यांचा मुलगा कुशाग्र कदम, आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे अशी अनेक उदाहरणे घराणेशाहीची देता येतील. मोशीतील शिवसेना नेते धनंजय आल्हाट आणि राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी नगरसेवक वसंत बोऱ्हाडे जवळचे नातेवाईक आहेत.

माजी आमदार विलास लांडे यांचा तर घराणेशाहीत कोणीच हात धरू शकत नाही. माजी नगरसेवक विक्रांत लांडे आणि युवा नेते विराज लांडे यांना सुरक्षित प्रभागासाठी लांडेंनी मोहीम हाती घेतली आहे. आपलेच भाचे अजित गव्हाणे यांना शहराध्यक्षपदी आम्हीच संधी दिली, असे लांडे अभिमानाने सांगतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली, की स्थानिक नेत्यांना घराणेशाही आठवते.

पिंपरी-चिंचवडकरांचे दुर्दैव की, १९९९ पासून शरद पवार आणि अजित पवार यांनी तब्बल २० वर्षे शहराची सेवा केली. अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड शहर तळहातावरील फोडप्रमाणे जपले, वाढवले. शहराचा चौफेर विकास करण्याची क्षमता असतानाही अजित पवारांकडे स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांच्या कुरघोड्यांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पराभव पहावा लागला.

दुसरीकडे, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी  आपले बंधु कार्तिक लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनीआपले बंधू शंकर लांडगे यांना महापालिका राजकारणात सक्रिय केले आहे. किंबहुना आमदार बंधुंसाठी सुरक्षित प्रभागाची चाचपणीही सुरू झाली आहे. भाजपा सरचिटणीस राजू दुर्गे यांनी आपल्या मुलीला तिकीट मागितले आहे. तसेच, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते  सदाशिव खाडे आपल्या मुलासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा अशा सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी एकप्रकारे घराणेशाहीच चालवली आहे.

मग, घराणेशाही किंवा राजकीय वारसा केवळ पवार कुटुंबियांसाठीच लागू होतो का? असा सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना पडलेला प्रश्न आहे. पार्थ पवारांना विरोध करणाऱ्या स्थानिक नेत्यांना आपला मुलगा, मुलगी, जावई, भाचा यांना राजकीय वारसदार घोषित करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न आहे. २० ते २५ वर्षे सभागृहात, विविध पदांवर काम केल्यानंतरही परिसर आणि समाजाच्या विकासाच्या नावाने मते मागण्यापेक्षा कार्यकर्त्यांना ज्येष्ठांनी संधी दिली, तर आदर्श निर्माण होईल आणि कार्यकर्त्यांन्या खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, पण… बुडाखालचा अंधार कुणाला दिसणार? हाच सांप्रतला प्रश्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button