Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

नाटकांचे प्रयोग पूर्वीच्याच धडाक्याने दिव्यांग कलाकार, रसिक दुर्लक्षित

मुंबई | करोनाचे निर्बंध कमी होत असल्याने पुन्हा व्यावसायिक नाटकांचे प्रयोग पूर्वीच्याच धडाक्याने आणि उत्साहाने सुरू झाले आहेत. मागील दोन वर्षांत घरात बसून कंटाळलेला प्रेक्षकही टीव्हीपासून दूर जात पुन्हा प्रत्यक्ष नाट्याविष्काराचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. कलाकार प्रेक्षकांच्या भेटीसाठी उत्सुक असताना मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये अजूनही दिव्यांग कलाकार आणि रसिकांसाठी पुरेशा सोयीसुविधा नसल्याचे दिसत आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मुंबईसारख्या शहरामध्ये दिव्यांग कलाप्रेमी आणि कलाकारांसाठीही कलाविष्कार सादरीकरण आणि अनुभवाची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कलाकार आणि कलाप्रेमी म्हणून दिव्यांग व्यक्तींना उपलब्ध होणाऱ्या संधी, उपलब्ध न होणाऱ्या संधी, त्यातील अडचणी याचीही चर्चा होण्याची गरज बोलून दाखवली जात आहे.

कलादिग्दर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते सुमीत पाटील यांनी नेत्रहीन व्यक्तींच्या कलेला चालना मिळावी यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. दिव्यांग कलाकार आणि कलाप्रेमी यांच्या रंगमंचीय अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी परदेशांमध्ये दिव्यांग कलाकारांसाठी जसे रंगमंच आहेत तसे आपल्याकडे नाहीत, असे सांगितले. परदेशात अॅक्सेसिबल थिएटर ही संकल्पना असते. तिथे नेत्रहीनांसाठी खास फरशा असतात, प्रकाशयोजना, ध्वनिसंयोजन वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केलेले असते. चाकाची खुर्ची वापरणाऱ्या कलाकारांसाठी या खुर्च्या सहज पद्धतीने फिरवता याव्यात अशी व्यवस्था असते. रॅम्प असते. गतिमंद कलाकार योग्य मार्गदर्शनाच्या बळावर रंगमंचापर्यंत सहज पोहोचू आणि वावरू शकतात. मात्र तिथपर्यंतच्या प्रवासात अनेक पायऱ्या किंवा असे काही अडथळे येऊ नयेत याची काळजी घेतली जाते. आपणही या पद्धतीने विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या सोयी-सुविधा नसल्याने हे आविष्कार संबंधित शाळा किंवा कॉलेजांमध्ये होतात आणि तिथपर्यंत फारसे सामान्य प्रेक्षक पोहोचत नाहीत. सामान्य नाट्यगृहांमध्ये अशा प्रयोगांसाठी सवलत मिळायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

रंगमंच हे सगळ्याच दिव्यांगांसाठी सुलभ व्हायला हवेत, असा मुद्दा दिग्दर्शक स्वागत थोरात यांनी मांडला. नेत्रहीनांच्या रंगभूमीसाठी ते कार्यरत आहेत. काही नाट्यसंस्था, दिग्दर्शकांनी धाडस करून दिव्यांगांनाही संधी द्यायला हवी. यासाठी वेगळ्या मेहनतीची तयारी असणे आवश्यक आहे. एखाद्या नाटकात चाकाच्या खुर्चीवर काम करणाऱ्या व्यक्तीची भूमिका असेल तर प्रत्यक्षात अशा कलाकार व्यक्तीला संधी देण्याचा विचार केला जायला हवा, असे ते म्हणाले. कर्णबधिर व्यक्तींपर्यंत नाटके पोहोचवण्यासाठी चिन्ह भाषेचा उपयोग करून काही खास नाट्यप्रयोगांचे आयोजन होऊ शकते अशी सूचना त्यांनी केली.

नाट्यशालेच्या माध्यमातून गेल्या ४१ वर्षांपासून विविध दिव्यांग आणि विशेष मुलांसोबत रंगकर्मी कांचन सोनटक्के यांनी नाट्यप्रयोग केले आहेत. अशा कार्यक्रमांना नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ‘भरारी’सारख्या विनाशब्द नाटकाचे भारतभरात ९० प्रयोग झाले असून, कर्णबधिर रसिक प्रेक्षकांनी हा आनंददायी अनुभव असल्याची भावना व्यक्त केली होती. अशा प्रयोगांसाठी नाट्यगृह, सभागृह मिळवण्यामध्ये अडचणीही येतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. या कलाकारांना मुख्य प्रवाहामध्ये फारसा वाव मिळाला नाही. यातही संवादाची अडचण येऊ शकते. मात्र या मुलांमध्ये खूप कलागुण असतात, असे त्या म्हणाल्या. इतर अनेक सामान्य प्रेक्षकांप्रमाणे दिव्यांगांना नाट्याविष्काराचा अनुभव घेता यावा या दृष्टीने नाट्यगृहांमध्ये दरवाजाजवळ दिव्यांगांसाठी काही राखीव जागा, तिकीट दरामध्ये सवलत अशा मुद्द्यांचा विचार करता येऊ शकेल असे त्यांनी सुचवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button