TOP Newsमहाराष्ट्र

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’तून ९९८ नवीन वीजजोडण्या

योजनेला येत्या ६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे l प्रतिनिधी

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी सुरु असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’तून पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत ९९८ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, लाभार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता व वीजजोडण्यांची भविष्यातील मागणी पाहता या योजनेचा कालावधी राज्य शासनाकडून दि. ६ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थ्यांना या योजनेमधून घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे केवळ ५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेत पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत ९९८ नवीन घरगुती वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

या योजनेत वीजजोडणीचा अर्ज महावितरणकडून मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी तसेच इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधीत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमून्यातील अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button