TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पोलीस आयुक्तांचे पुन्हा एकदा वेषांतर

ज्यांच्या नावाने खंडणी मागितली ते स्वतः समोर आले तरी ओळखता येईना ; आरोपीची पंचाईत
पिंपरी l प्रतिनिधी
पाच जणांच्या टोळक्याने जमिनीची प्रकरणे मार्गी लावून देण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी ओळख असल्याचे सांगून अनेकांकडून खंडणी घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर केले आणि आरोपीला पकडण्याचा सापळा लावला. जुना पुणे मुंबई महामार्गावर भक्ती शक्ती चौकाजवळ एका हॉटेलमध्ये सापळा लावून पोलिसांनी तिघांना अटक केली.
रोशन संतोष बागुल (वय 22, रा. देहूगाव), गायत्री रोशन बागुल (वय 22, रा. देहूगाव), पूजा विलास माने (वय 22, रा. देहूगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह ज्ञानेश्वर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), अजित हाके (रा. त्रिवेणीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विन्सेंट अलेक्झांडर जोसेफ (वय 52, रा. ताम्हाणेवस्ती, मोरेवस्ती, चिखली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 26) रात्री नऊ ते साडेनऊ वाजताच्या कालावधीत करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी रोशन याने फिर्यादी यांना त्यांच्या जमिनीचे प्रकरण हाताळण्यासाठी खंडणीची मागणी केली होती. रोशन हा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश तसेच त्यांचे बॉस विश्वास नांगरे पाटील यांच्याशी देखील चांगली ओळख आहे. मी त्यांची जमिनीचे कामे केली आहेत, अशी बतावणी आरोपीने केली. त्यानुसार फिर्यादी यांनी रोशन आणि त्याच्या साथीदारांना पैसे घेण्यासाठी भक्ती शक्ती चौकाजवळ एका हॉटेलमध्ये बोलावले.
दरम्यान हा प्रकार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना समजला. त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी स्वतः वेषांतर केले. पोलीस आयुक्त स्वतः आरोपीसमोर हॉटेलमध्ये बसले. पैशांची देवाण घेवाण झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्यांना ओळखतो का, असे आरोपीला विचारले मात्र आरोपीने पोलीस आयुक्तांना ओळखले नाही. बाहेर पोलीस आयुक्तांशी आपली ओळख असल्याची शेखी मिरवणा-या आरोपीला पोलीस आयुक्त स्वतः समोर आले असताना सुद्धा ओळखता आले नाहीत.
पोलिसांनी आरोपी रोशन आणि त्याच्या दोन साथीदार महिलांना अटक केली. दरम्यान दोघेजण घटनास्थळावरून पळून गेले. देहूरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
आरोपी रोशनकडे पोलिसांना एक ओळखपत्र मिळाले आहे. त्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आहे. तसेच त्यावर रोशन हा सायबर क्राईम विभागात काम करत असल्याचे त्याला राज्यभर ठिकठिकाणी तपासाला जाण्याची परवानगी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button