breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

चित्रीकरणावेळी शिस्त आवश्यकच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई |

निर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही, पण करोनाचा संसर्ग अजूनही असल्याने चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण करोनाविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा चालणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. करोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे आणि सुरक्षितरीत्या निर्बंध कमी करण्यासाठी राज्य सरकार पावले टाकत आहे, असे संकेतही त्यांनी दिले. चित्रपट निर्मात्यांच्या सर्वात मोठी संस्था असलेल्या ‘प्रोड्युसर्स गिल्ड’च्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून चर्चा केली. बैठकीस प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा तसेच सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव सहभागी झाले होते.

दुसऱ्या लाटेतूनदेखील आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नसून जगातील इतर देशांत परत तिसरी लाट उसळल्याचे दिसते. त्यामुळे आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर करोना चाचणी करीत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनीदेखील प्रत्येक चित्रीकरणाचे वेळापत्रक, चित्रीकरण ठिकाण व वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी आणि एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी टाकून व्यवस्थित व नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून मगच चित्रीकरणाला परवानगी द्यावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

राज्य शासनाच्या करोनाविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल अशी ग्वाही चित्रपट निर्मात्यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते करोनाकाळात नियमांचे पालन करून चित्रीकरण करीत आहेत, परंतु चित्रीकरणाच्या वेळेत वाढ करणे गरजेचे आहे, सायंकाळी ४ नंतरदेखील चित्रीकरण करण्यास परवानगी देण्याची मागणी निर्मात्यांनी केली. या वेळी करोना नियंत्रणविषयक कृती गटाचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनीदेखील करोना सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. तर पोलिसांतर्फे नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button