breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मतभेद मिटले : नवनगर विकास प्राधिकरणाच्या निमित्ताने ‘राम-लक्ष्मण’ एकवटले!

  • प्राधिकरण विलीनीकरणाच्या मुद्यांवर राज्य सरकार विरोधात मैदानात

  • आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे भाजपाने रणशिंग फुंकले

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताकाळात पदवाटप, विकासकामांवरुन मतभेद असल्यामुळे पिंपरी-चिंचवड भाजपामध्ये उभी फूट पडली आहे, असे चित्र असतानाच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विलीनीकरणाच्या मुद्यावर ‘राम-लक्ष्मण’ जोडी पुन्हा एक झाल्याचे दिसले. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये विसर्जन करण्यात आले. राज्य सरकारचा हा निर्णय पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या विरोधात आहे, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक नेत्यांची आहे. प्राधिकरण विसर्जनाची अधिसूचना जारी झाल्यानंतर लगेचच भाजपा नेत्यांची पत्रकार परिषद घेतली.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेच्या निमित्ताने महापालिकेतील लांडगे- जगताप समर्थक पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आले. त्यामध्ये जुन्या गटातील पदाधिकारीही सहभागी होते. त्यामुळे भाजपामधील जुना- नवा, लांडगे गट, जगताप गट असा मतभेद आता निवळला आहे, अशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात होताना दिसत आहे.

आमामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी होण्याची चिन्हे आहेत. भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्राधिकरण विलीनीकरण निर्णयाचे स्वागत करीत एकप्रकारे महाविकास आघाडीच्या निर्णयाचे समर्थन केले.

मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी सोयीनुसार भूमिका बदलली आहे. बारणे यांनी पूर्वी प्राधिकरणाच्या विलीनीकरणाविरोधात विराट मोर्चा काढला होता. आता त्यांना पक्षादेशानुसार भूमिका बदलावी लागत आहे, असा टोला आमदार जगताप यांनी लगावला आहे. त्यामुळे आतापासूनच महापालिका निवडणुकीचे रणशिंग भाजपाने फुंकले आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

***

‘भूमिपुत्र कार्ड’ परिणामकारक ठरणार?

प्राधिकरणाच्या विलीनीकरणामुळे पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांवर अन्याय होणार आहे, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी भूमिपुत्रांविरोधात आहे, असे वातावरण निर्माण केले जात आहे. २०१७ मध्ये अशाच प्रकारे ‘‘नको बारामती, नको भानामती…पिंपरी-चिंचवडची सत्ता देवू राम-लक्ष्मणच्या हाती…’’ अशी भीमगर्जना करीत भाजपाने सत्ता संपादन केली होती. आता पुन्हा प्राधिकरणाच्या निमित्ताने भाजपाने भूमिपुत्र कार्ड बाहेर काढले आहे. त्याचा कितपत फायदा भाजपाला होणार? हे महापालिका निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button