breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबईराजकारण

आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेलं डायलिसिस केंद्र १७ दिवसांपासून बंद; रुग्णांचे हाल

कल्याण |

गेल्या महिन्यात कल्याण डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने गाजावाजा करत पालिका हद्दीतील विविध विकासकामांची उद्घाटने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केली. यामध्ये कल्याण पूर्व येथील तिसगाव गावठाण येथील पालिकेच्या पहिल्या डायलिसिस केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर १७ दिवसांपासून डायलिसिस केंद्र बंद असल्याने कल्याण-डोंबिवली सह मुरबाड, शहापूर, कर्जत, बदलापूर, भिवंडी भागातून येणाऱ्या रुग्ण नातेवाइकांचे हाल होत आहेत. येत्या आठवड्यात केंद्र सुरू करण्यात आले नाही तर या केंद्रासमोर उपोषण सुरू केले जाईल असा इशारा आम आदमी पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी दिला आहे. हे केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आपच्या कार्यकर्त्यांनी केंद्रासमोर निदर्शने केली.

पालिका हद्दीतील डायलिसिस करणाऱ्या रुग्णांना या उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई शहरात जावे लागू नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने स्वतःचे पहिले डायलिसिस केंद्र सुरू केले आहे. कल्याण पूर्व येथील तिसगाव गावठाण येथील यशवंत छत्र बंगला, अमराई रोड, विजयनगर येथे ३२०० चौरस फूट जागेमध्ये केंद्र सुरू करण्यात आले आहे. मेसर्स अपेक्स किडणी केअर संस्था केंद्र चालविणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेसाठी रुग्णा जवळ पिवळी, नारिंगी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. या योजनेत समाविष्ट होऊ न शकणाऱ्या रुग्णांना ८४९ रुपये आणि एचआयव्ही बाधित रुग्णांना ८५१ रुपये अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रात दहा रुग्णशय्या आहेत. दररोज तीस रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील यांनी दिली.

या केंद्राचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दुसऱ्या दिवसापासून ही सुविधा उपलब्ध होईल म्हणून खासगी रुग्णालयातील डायलिसीस खर्चाला कंटाळलेल्या अनेक रुग्णांनी तिसगाव येथील पालिकेच्या डायलिसिस केंद्रात उपचारासाठी फेर्‍या मारण्यास सुरुवात केली. केंद्र बंद असल्याने शहापूर, भिवंडी, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ परिसरातून येणाऱ्या रुग्णांना उपचार न घेता परत जावे लागत होते. डायलिसिस केंद्र बंद असल्याच्या अनेक तक्रारी आप पदाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. यासंदर्भात आपच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेत संपर्क केला. त्याला समर्पक उत्तरे न दिल्याने पदाधिकाऱ्यांनी केंद्रासमोर निदर्शने केली. येत्या आठवड्यात हे केंद्र सुरू केले नाही तर उपोषण करण्याचा इशारा आपच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.  “डायलिसिस केंद्राचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेकडे नोंदणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले नाही. दुर्बल घटकातील रुग्णांचे डायलिसिस करणे त्यामुळे शक्य होत नाही. येत्या पाच दिवसात नोंदणीकरण प्रक्रिया पूर्ण होऊन केंद्र सुरू होईल,” अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button