ताज्या घडामोडीमुंबई

मुंबई : केंद्र सरकारमुळे धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडला ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठपका

मुंबई | धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सर्व तयारी झाली असून रेल्वेच्या जमिनीसाठी ८०० कोटी रुपयेही जमा केले आहेत. पण केंद्र सरकारकडून अजूनही त्या जमिनीचा ताबा न मिळाल्याने धारावी प्रकल्प रखडल्याचे सांगत हा प्रकल्प रखडल्याबद्दलचा ठपका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर ठेवला. तसेच रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागावेत आणि रहिवाशांना हक्काची घरे मिळावीत यासाठी अभय योजना लागू करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

मुंबईचा सोन्याचा अंडे देणारी कोंबडी असाच विचार आजवर केला गेला. ही कोंबडी सोन्याचे अंडे देत आहे व लोक ते घेऊन जात आहेत. पण त्या कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता. ती निगा राखण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने हाती घेतले आहे.

शिवसेनाप्रमुखांनी १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यावर झोपडपट्टीवासीयांना हक्काचे मोफत घर देण्याचा विचार मांडला व त्या दिशेने काम सुरू केले. त्यानंतर किती वर्षे झाली तरी अनेक झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प सुरू झाले, पण त्याची गती मंद राहिली. महाविकास आघाडीचे सरकार केवळ बोलणारे नाही तर जे बोलतो ते करून दाखवणारे सरकार आहे. मुंबईकरांच्या हिताच्या सर्व गोष्टी आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

फनेल झोनमधील इमारती

मुंबईतील हवाईमार्गात (फनेल झोन) येणाऱ्या विमानतळ परिसरातील उंच इमारतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात राज्य शासनाने प्रारुप आराखडा तयार केला असल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

मुंबईतील केंद्राच्या जागा

केंद्राच्या ज्या जागा मुंबईत आहेत त्यांचे काय करायचे, त्यांचा वापर कसा करायचा हे ठरवावे लागेल. त्याचा नुसता विचार करून चालणार नाही. तर केंद्र व राज्याने मिळून त्याचा एकदा निकाल लावला पाहिजे, असे मतही ठाकरे यांनी मांडले. मेट्रो ३ साठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय केंद्राच्या अखत्यारीत असल्याने हा विषय मुख्यमंत्र्यांनी काढल्याचे मानले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button