breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजन

धम्माल किस्से अन् प्रेक्षकांचा हास्यकल्लोळ.. सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांनी जिंकली पिंपरी चिंचवडकरांची मने!

पिंपरी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय हास्यमालिकेचे पडद्यावरचे आणि पडद्यामागे घडलेल्या अनेक धम्माल किश्श्यांसह सिने, नाट्य, दूरचित्रवाहिनी क्षेत्रातील भन्नाटे किस्से सांगून निर्माते व दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी पिंपरी चिंचवडकरांची मने जिंकली.

निमित्त होते, दिशा सोशल फाऊंडेशन आयोजित प्रकट मुलाखतीचे. विनोदाचे विविध प्रकार, दर्जा, फसलेले तसेच विसंगतीतून निर्माण झालेले विनोद, समाजातील वास्तव, सध्याच्या राजकीय सद्यस्थितीवर केलेले सूचक भाष्य आणि सोशल मिडीयातून एखादी गोष्ट ‘व्हायरल’ होण्याचे वाढते प्रकार अशा विविध विषयांवर त्यांनी परखड ‌व अभ्यासपूर्ण भाष्य करतानाच वेळप्रसंगी उपस्थितांना अंर्तमुखही केले.

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम रविवारी (दि.१७) चिंचवड मध्ये प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला होता. प्रसिध्द अभिनेता व निवेदक संकर्षण कऱ्हाडे यांनी दोघांना बोलते केले. माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते गोस्वामी आणि मोटे यांना ‘दिशागौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हा, हास्यजत्रेला मिळालेल्या उत्तुंग यशामागे ‘सोनी मराठी’चे अमित फाळके, अजय भालवणकर यांच्यासह हास्यजत्रासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचे मोठे योगदान आहे. आम्ही प्रातिनिधीक स्वरूपात या पुरस्काराचा स्वीकार करत असल्याची भावना त्यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. संजीवकुमार पाटील, किरण येवलेकर, प्रभाकर पवार, अभय बलकवडे या संस्थांत्मक प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे व्यासपीठावर उपस्थित होते. संकर्षण कऱ्हाडे यांच्या खुशखुशीत निवेदनाने कार्यक्रमाची रंगत खूपच वाढली.

सचिन गोस्वामी म्हणाले की, दिग्दर्शकाने पालकाच्या भूमिकेत राहिले पाहिजे. त्याने मालक होऊन चालत नाही. प्रेक्षकांची भूक मोठी असते, त्यांचे मनोरंजन होणे महत्वाचे असते. आई मुलावर ज्या पध्दतीने प्रेम करते, त्या पध्दतीने प्रेक्षक कलावंतांवर मनापासून प्रेम करतात. मुलगा कितीही गबाळेपणाने राहत असला तरी, आईचे प्रेम तसूभरही कमी होत नाही. याचा अर्थ मुलाने कायम गबाळेच रहायचे नसते. तसेच कलावंताचे आहे. त्यांनी त्यांच्या कामात सातत्यपूर्ण सुधारणा केली पाहिजे. कलावंतांना कधीही चुकीचे प्रोत्साहन देऊ नये, त्यामुळे त्यांचे पतन होऊ शकते. चुकीचे प्रोत्साहन मिळाल्याने रंगमंचावर आलेला कलावंत सांस्कृतिक क्षेत्राला मोठा धोका असतो. एकमेकांकडून अपेक्षा न ठेवणे आणि परस्परांवर हक्क न गाजवणे, हे सूत्र आम्ही पाळले. अपेक्षा नाही म्हणून असूया नाही. त्यामुळे कित्येक वर्षे आमची जोडी टिकून राहिली.

सचिन मोटे म्हणाले की, कोणतीही यशस्वी गोष्ट ही त्या काळाचे अपत्य असते. ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चनच्या यशस्वी युगानंतर शाहरूख खानच्या प्रेमकथांना यश मिळते. देशभक्तीने भारावलेल्या काळात अक्षय कुमारचे चित्रपट चालतात. तत्कालीन परिस्थिती कशी आहे, यावर बऱ्यापैकी यश, अपयश अवलंबून असते. करोनाकाळात जास्त प्रमाणात पाहिल्या गेलेल्या हास्यजत्रेच्या बाबतीतही तसेच झाले आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अपेक्षा त्या त्या काळाशी अनुरूप असते. प्रेक्षक हेच कलाकारांचे खरे प्रोत्साहन असते. खऱ्या अर्थाने काम मेंदू करतो. तो मागे असतो. समोरून फक्त चेहरा दिसतो, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक नाना शिवले यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. संतोष निंबाळकर यांनी आभार मानले.

उपस्थितांमध्ये वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे, पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, निवृत्त अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्राजक्ता रूद्रवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आम्ही दोघेही ‘मुख्य’, आमचेही दोघांचेच मंत्रीमंडळ..

मी धुळ्याचा तर सचिन मोटे सातारचा. आमची अनेक वर्षांची ‘युती’ आहे. आमच्यात कोणी ‘मुख्य’ तथा ‘उपमुख्य’ नाही. दोघेही मुख्य आहोत. आमचेही दोघांचेच मंत्रीमंडळ आहे. दोघांच्या गावांदरम्यान कुठेही सूरत तथा गोवाहाटी येत नाही, अशी सूचक टिप्पणी सचिन गोस्वामी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीला धरून केली. तर, ‘उपमुख्य’ असूनही एखादा ‘मुख्य’ असूच शकतो, असे सांगून मोटे यांनी त्यात भर घातली. ‘तुमचा शपथविधी पहाटे झाला नव्हता ना’, असे म्हणत संकर्षणने कळस केला. या प्रत्येक वाक्यावर सभागृहात हास्यकल्लोळ होत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button