क्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांचा आदेश असतानाही 18 वर्षाखालील खेळाडूंना महापालिका स्टेडियमवर सरावास मनाई

पिंपरी चिंचवड | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व सुविधा सुरु केल्या जात आहेत. शाळाही सुरु झाल्या आहेत. 18 वर्षांखालील खेळाडूंना सरावासाठी परवानगी देण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा आदेश असतानाही क्रीडा विभागाकडून 18 वर्षाखालील खेळाडूंना पालिकेच्या भोसरीतील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल (स्टेडियम) वर सरावास मनाई केली जात आहे. त्यामुळे पालक, खेळाडूंकडून महापालिकेच्या अजब कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर जलतरण तलाव सुरू करण्याचा आदेश दोन महिन्यांपूर्वी काढूनही तलाव अद्यापही सुरू झाले नाहीत.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाला 50 हून कमी रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने सर्व सुविधा सुरु केल्या आहेत. सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आहेत. शाळाही सुरु झाल्या आहेत. शहरातील 18 वर्षाखालील खेळाडूंसाठी योग्य खबरदारी घेऊन सराव सुरु ठेवता येईल असा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी 3 जुलै 2021 रोजी काढला आहे.

तसेच महापालिका परिसरातील महापालिकेच्या सर्व मैदानावर खेळले जाणारे मैदानी खेळाचे सराव सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. असे असतानाही महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून 18 वर्षाखालील खेळाडूंना पालिकेच्या मैदानावर, हॉलमध्ये सराव करण्यास मनाई केली जात आहे. खेळाडूंना सराव करता येत नाही. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील जलतरण तलाव जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंच्या सरावासाठी 21 सप्टेंबर 21 पासून तलाव सुरु करण्याचा आदेश आयुक्तांनी काढला. परंतु, दोन महिने होत आले. तरी, तलाव सुरु झाले नाहीत. देखभालीच्या कामामुळे तलाव बंद असल्याचे क्रीडा विभागाकडून सांगितले जाते. मग, तलाव सुरु झाले असल्याचे आदेश कशासाठी काढला असा सवाल उपस्थित केला जात आहे.

“एकीकडे पहिलीपासून शाळा सुरू करण्याचे शासन आदेश देत आहे. तर, दुसरीकडे 18 वर्षाखालील खेळाडूंना सरावासाठी मनाई केली जात आहे. महापालिकेच्या मैदानावर सराव करू दिला जात नाही. खेळाडू वर्षानुवर्षे मैदानी स्पर्धेसाठी सराव करत असतात. स्पर्धेसाठी तयारी करण्याची गरज असताना पालिकेच्या या भूमिकेमुळे खेळाडूंचे प्रचंड नुकसान होणार आहे. याचा विचार करून महापालिका प्रशासनाने 18 वर्षाखालील खेळाडूंना सरावासाठी परवानगी द्यावी” अशी मागणी एक पालकाने केली आहे.याबाबत बोलताना क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे म्हणाल्या, ”कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाच मैदानावर सरावासाठी परवानगी दिली आहे. 18 वर्षाखालील लोकांचे लसीकरण झाले नाही. त्यामुळे त्यांना परवानगी दिली जात नाही. त्याबाबतचे स्वतंत्र आदेश काढले नाहीत. सुपरवायझर लोकांना सूचना दिल्या आहेत. 18 वर्षाखालील मुलांना लस उपलब्ध नसल्याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. तर, जलतरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरु आहे. भोसरी, पिंपळेगुरव येथील तलाव सुरु करण्याची वर्क ऑर्डर दिली आहे. पाणी भरायला वेळ लागत आहे. पुढील दोन दिवसात चालू होतील, असेही त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”18 वर्षाखालील खेळाडूंसाठी योग्य खबरदारीने सरावास 3 जुलै 21 रोजीच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे. खेळाडूंना काही मैदानावर सराव करु दिला जात नसेल. तर, त्याबाबत क्रीडा विभागाला सूचना दिल्या जातील”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button