breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अखेर सोडलं मौन, तब्बल ६४ कारखान्यांची यादीच ठेवली समोर; म्हणाले…

पुणे |

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकीकडे आर्यन खानच्या अटकेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पवार कुटुंबीयांवर आयकर विभागाने सलग ६ दिवस टाकलेल्या छाप्यांची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषत: जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना मातीमोल किंमतीला विकला गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर त्यावरून अजित पवार आणि त्यांच्या कटुंबीयांवर निशाणा साधण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर अखेर अजित पवारांनी मौन सोडलं असून तब्बल ६४ सहकारी साखर कारखाने आणि एका सूत गिरणीची यादीच त्यांनी समोर ठेवली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याविषयी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत या ६५ व्यवहारांविषयी कुणीच काहीच का बोलत नाही, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

  • “..पण आता पार अतिरेक झालाय”

जरंडेश्वर प्रकरणावरून होत असलेले आरोप आणि चर्चांचा आता अतिरेक झाल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. “या गोष्टीला १२-१५ वर्ष झाली असतील. मी म्हटलं कशाला आपण त्याला उत्तर द्यायचं. पण त्याचा आता पार अतिरेक झालाय. २५ हजार कोटी, १० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मागच्या सरकारने सीआयडीची चौकशी केली, एसीबीनं चौकशी केली, इओडब्ल्यूनं चौकशी केली. सहकार विभागाने न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून चौकशी केली. त्यात कुणाला काही गैरप्रकार आढळला नाही”, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

यावेळी अजित पवारांनी एकूण ६४ सहकारी साखर कारखाने आणि एक सूत गिरणी अशा ६५ व्यवहारांची यादीच वाचून दाखवली. गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व कारखान्यांचे व्यवहार झाल्याचं ते म्हणाले. नेमक्या किती किंमतीला कोणता कारखाना कुणी विकत घेतला, याची सविस्तर माहिती यावेळी बोलताना अजित पवारांनी दिली. “मागे लोक म्हणायचे की हे कारखाने मातीमोल किंमतीला विकले जातात. पण हे व्यवहार पाहाता कोट्यवधींच्या किमतीलाच कारखाने विकले जात आहेत”, असं देखील त्यांनी नमूद केलं. अजित पवारांनी सादर केलेल्या यादीमध्ये देखील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख आहे.

“राज्य सहकारी बँकेने एकूण ३० कारखाने विकले, ६ कारखाने जिल्हा बँकेनं विकले. शासनमान्यतेनं विक्री केलेल्या ६ कारखान्यांमध्ये २००३ साली शेतकरी सहकारी साखर काखाना ३ कोटी ३६ लाखांना विकला गेला. जिल्हाधिकाऱ्यांनी शासनमान्यतेनं विक्री केली. इतक्या कमी किमतीला झालेल्या व्यवहारांची कुणी चर्चाही करत नाही, कुणी बोलतही नाही”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.

  • “…पण हे कुणी लक्षाच घेत नाहीये”

दरम्यान, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याविषयी बोलताना अजित पवारांनी सर्वोच्च न्यायालयाने कारखान्याकडून दाखल करण्यात आलेली रीट याचिका तीन ते चार वेळा फेटाळून लावल्याची माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसारच राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली, पण हे कुणी लक्षातच घेत नाहीये. ज्यांच्यामुळे कारखान्याचं नुकसान झालं, तेच अशा पद्धतीने चुकीचं काहीतरी लोकांसमोर सांगत आहेत”, असा दावा अजित पवारांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button