ताज्या घडामोडीमुंबई

वंचित-काँग्रेसची आघाडी?; भाई जगताप, प्रकाश आंबेडकरांची गुप्त बैठक

मुंबई |  आगामी महापालिका निवडणुकांसाठी नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच मुंबईत एक नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच एक गुप्त बैठक झाल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, लवकरच काँग्रेसमधील बड्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकर यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी कार्यरत आहे. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीत हे तिन्ही सत्ताधारी पक्ष आघाडी म्हणून उतरण्याची शक्यता कमी आहे. शिवसेनेचा मुंबईतील जनाधार मोठा आहे. काँग्रेसचा जनाधार घटलेला असल्याने काँग्रेसची अव्वाच्या सव्वा जागांची मागणी शिवसेना मान्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळेच या निवडणुकीत नेमकी कोणती राजकीय समीकरणे जुळतील याबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहेत. शिवसेनेसोबत आघाडी न झाल्यास मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याशिवाय काँग्रेस पक्षाला पर्याय असणार नाही. त्याबाबतच्या घोषणाही काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी सूत जुळवण्याचे प्रयत्न मुंबई काँग्रेसने सुरू केल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. याबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची एक बैठक मुंबईत पार पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही आघाडी व्हावी यासाठी मुंबई काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले असून, याबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी लवकरच दिल्लीतही बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही निवडणुकीत काँग्रेसकडून मुस्लिम, दलित आणि उत्तर भारतीय मते दुरावली होती. ही मते पुन्हा आपल्या पारड्यात पडण्यासाठी मुंबई काँग्रेसने हे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

रिपब्लिकन सेनेबरोबरही चर्चा करणार

मुंबई काँग्रेस लवकरच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. या माध्यमातून दलित मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू करण्यात आल्याचे कळते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button