breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नैराश्यग्रस्त राजकीय घटकांमुळे शांततेला गालबोट- शरद पवार

नाशिक |

राज्य शांतपणे वाटचाल करीत असताना अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमरावती बंद शांततेत पार पडल्यानंतर एका राजकीय पक्षाने जिल्हा बंदचा निर्णय घेतला. याचा अर्थ काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य सार्वजनिक शांततेला धक्का बसेल अशा कृत्यातून काढत असून हे दुर्दैवी असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेत्यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. त्रिपुरात काहीच घडले नसल्याचे एका महत्त्वाच्या व्यक्तीचे विधान आपण ऐकले. पण बातम्यांमधून तिकडे वाहनाला आग लावलेले दृश्य बघितले. तिकडे काही घडले म्हणून महाराष्ट्रात काही घडायला पाहिजे असे नाही. काही संघटना कुठलाही संबंध नसताना रस्त्यावर येतात. त्यामुळे दोन, तीन ठिकाणी घटना घडल्या. या प्रवृत्तीबाबत लोकांनी विचार करायला हवा. ज्यांनी राज्य चालविले, त्यांनी राज्याच्या हिताला धक्का बसणार नाही, अशी भूमिका घेतली पाहिजे. त्याचे भान संबंधितांना राहिले की नाही अशी शंका यावी, अशी ही स्थिती आहे. तीन-चार राज्यांतील निवडणुका डोळय़ासमोर ठेवून जाणीवपूर्वक हे घडविले जात आहे. त्याचे दुष्परिणाम सामान्य जनता आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होतात. एक दिवसाचा बंद म्हणजे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

केंद्रीय यंत्रणांचे छापासत्र हा नित्याचा भाग बनला आहे. ठरावीक अधिकाऱ्यांमार्फत ठरावीक लोकांना यातना देण्याचा प्रयत्न होत आहे. देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांना काही गोष्टींची पूर्तता करता आली नाही. लक्ष विचलित करण्यासाठी ते या गोष्टी करीत आहेत. या घटनाक्रमात यातना, त्रास, चौकशी होईल. मात्र लोकशाही मार्गाने लोक त्यांना बाजूला करतील, असे पवार यांनी सांगितले.

अभिनेत्री कंगनाच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्याची नोंद घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले. नक्षलवाद्यांसंदर्भात पवार म्हणाले की, नक्षलवादी विचार ज्यांनी स्वीकारले, त्यांचा संविधानावर विश्वास नाही. ते कायदा हातात घेतात. सर्व आदिवासींना नक्षलवादी ठरवू नये. नक्षलग्रस्त भागात विकास कामे जलदगतीने करून नव्या पिढीला भविष्याबाबत विश्वास निर्माण व्हायला हवा.

  • ‘एसटी कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये’

राज्य परिवहनच्या संपाने केवळ कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांची विलीनीकरणाची मागणी लगेच पूर्तता करण्यासारखी नाही. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांनी यातून मार्ग काढावा. कर्मचारी संपामुळे राज्य परिवहनच्या नागरिकांच्या मनातील आस्थेला धक्का बसला आहे. तुटेपर्यंत ताणू नये, असा सल्ला पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button