Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

म्हाडा प्राधिकरणाच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नवीन इमारतींच्या आरेखनात तातडीने बदल करण्याची मागणी

मुंबईः म्हाडा प्राधिकरणाच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नवीन इमारतींच्या आरेखनात तातडीने बदल करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकल्पातील रहिवाशांना पुरविण्यात येणाऱ्या इमारतीत पुरेसा प्रकाश आणि वायुविजन उपलब्ध होणार नसल्याने त्या ठिकाणी टीबीसारख्या आजारांचा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ शकतो, अशी भीती नामवंत शहर रचनाकार, वास्तुविशारदांनी गुरुवारी प्रेस क्लबमधील एका विशेष कार्यक्रमात व्यक्त केली. या प्रकल्पातील इमारतींच्या आरखेनामध्ये तातडीने बदल करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुमारे १२० शहर नियोजनकार, वास्तुविशारदांच्या गटाने केली आहे.

म्हाडाच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बांधकाम सुरू असणाऱ्या वरळी येथील प्रकल्पपूर्तीनंतर तिथल्या रहिवाशांना जाणवू शकणाऱ्या विविध उणिवा, आरोग्याच्या त्रासाविषयी गुरुवारी प्रेस क्लबमध्ये नामवंत वास्तुविशारद शिरीष पटेल आणि प्रख्यात शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी माहिती दिली. या प्रकल्पाने तिथल्या रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार असून, हाच धोका ना. म. जोशी मार्ग आणि नायगावमधील प्रकल्पातही उदभवू शकतो, असे मतही त्यांनी मांडले.

नामवंत शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी पुनर्विकासातील इमारतींच्या आरेखनावर आक्षेप घेतानाच, त्या प्रकल्पात रहाण्यास येणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचा मुद्दा दुर्लक्षित केल्याचा दावा केला आहे. या प्रकल्पात ४० मजल्याच्या ३२ इमारती उभ्या राहणार असून, तिथे पुरेसा प्रकाश खेळता राहणार नाही. तसेच अपुऱ्या वायुविजनाच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. म्हाडाकडून विक्री केल्या जाणाऱ्या इमारती ६५ मजली आणि त्यात अतिरिक्त १० मजले हे वाहनांच्या पार्किंगसाठी असणार आहेत. त्यामुळे, या इमारतींपुढे बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या इमारती झाकल्या जाणार असून, त्यात पुरेसा प्रकाश आणि वायुविजन उपलब्ध होणार नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मूळ रहिवाशांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्या इमारतीत खालच्या मजल्यावर राहणाऱ्यांना त्याचा अधिकच त्रास होऊ शकतो, असेही त्यांनी विशद केले.

‘आयडिया ऑफ न्यू बॉम्बे’ पुस्तकाच्या तीन लेखकांपैकी एक आणि नामवंत वास्तुविशारद शिरीष पटेल यांनी बीडीडी प्रकल्पातील नव्या इमारतींचे आयुर्मान १०० वर्षे इतके गृहीत धरल्यास तिथे राहणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे मत मांडले. त्यासाठीच या इमारतींचे आरेखन तत्काळ बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन

राष्ट्रीय गृहनिर्माण आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचेही या प्रकल्पातील आरेखनात उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोपही महाजन यांनी केला आहे. त्या सूचनांत दोन इमारतींमध्ये असणाऱ्या अंतराच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे. बीडीडी प्रकल्पात ४० मजल्याची इमारत बांधताना दोन इमारती, विंगमध्ये अंतर ४५ फूट इतके असणे अपेक्षित आहे. मात्र, या ठिकाणी ३४ मजल्याच्या इमारतीतील अंतर केवळ २५ फूट इतकेच असल्याकडे लक्ष वेधले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button