ताज्या घडामोडीमुंबई

‘डिलिव्हरी बॉइज’साठी चारित्र्य पडताळणी आवश्यक ; कंपन्यांच्या प्रतिनिधींना पोलीस आयुक्तांची सूचना

मुंबई |  कुरियर, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉइजची (बटवडा कर्मचारी) नियुक्ती करताना त्यांचा चारित्र्य पडताळणी अहवाल असणे आवश्यक आहे. चारित्र्य पडताळणी न केलेला ‘डिलिव्हरी बॉय’ एखाद्या गुन्ह्यांत सहभागी आढळल्यास कंपनीलाही जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी शनिवारी दिल्या.

कुरियर, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी शनिवारी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बैठक घेतली होती.

‘डिलिव्हरी बॉइज’विरुद्ध खूप तक्रारी येत असल्याने बैठक आयोजित करण्यात आली होती. ब्ल्यू डार्ट, अ‍ॅमेझॉन, ओवरसिज, स्विगी, मॅकडोनाल्ड आदी कंपन्यांचे मालक व्यवस्थापक, प्रतिनिधी असे ३० जण बैठकीला उपस्थित होते.

काही प्रकरणांमध्ये ‘डिलिव्हरी बॉइज’कडून लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नियुक्तीवेळी ‘डिलिव्हरी बॉइज’ची चारित्र्य पडताळणी न केल्यास कंपनीस जबाबदार धरण्यात येईल, असे पांडे यांनी सांगितले.

‘डिलिव्हरी बॉइज’ना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच कामाबाबतचे करारपत्र व आवश्यक ती सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तसेच ‘डिलिव्हरी बॉइज’ बेदरकारपणे दुचाकी चालवतात, वाहतुकीचे नियम मोडतात. तसेच एकत्रितरीत्या रस्त्यावर गोळा होऊन शांतता भंग करतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो, असे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबत ‘डिलिव्हरी बॉइज’ना योग्य ती समज देण्यात यावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

‘डिलिव्हरी बॉइज’ क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे, आकाराचे सामान घेऊन दुचाकी चालवणार नाहीत, याची कंपनीने दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याशिवाय ‘डिलिव्हरी बॉइज’ यांना व्यवस्थित गणवेश देणे व तो त्यांनी परिधान करणे बंधनकारक करावे, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या. कंपनी प्रतिनिधींनी सूचना मान्य करून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button