पिंपरी l प्रतिनिधी
घरासमोर जाऊन गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी पावणे आठ वाजता आकुर्डीगाव येथे घडली.
गिरीश विजय मानकर (वय 35, रा. नानापेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहन सुंदर यादव (वय ५१, रा. आकुर्डीगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा श्रीपाद मोहन यादव (वय 30) याचे आणि आरोपी गिरीश याचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यावरून रविवारी सकाळी आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आले. फिर्यादी यांच्या मुलाला आवाज दिला. त्यामुळे फिर्यादी यांनी दरवाजा उघडून त्यांचा मुलगा झोपला असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी गिरीश याने ‘त्याने माला शिवीगाळ करून मारहाण केली आहे. म्हणून आम्ही त्याला मारण्यासाठी आलो आहे’ असे म्हणून शिवीगाळ करत खिशातून पिस्टलच्या आकाराचे कव्हर काढून त्यात पिस्टल असल्याचे सांगत फिर्यादी यांच्या मुलाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.