TOP Newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

राज्यातील धरणे काठोकाठ ; लांबलेल्या पावसाने पाणीसाठा विक्रमी

पुणे, मुंबई : लांबलेला मोसमी पाऊस आणि परतीच्या पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने यंदा राज्यातील धरणांमध्ये विक्रमी पाणीसाठा जमा झाला आहे. मोठय़ा प्रकल्पांमध्ये सध्या एकूण ९७ टक्के पाणी आहे. गेल्या अनेक वर्षांतील हा ऑक्टोबरअखेरीस जमा होणारा विक्रमी पाणीसाठा ठरला आहे.

मोसमी पावसाच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेत २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत सर्वाधिक पाऊस झाला. याच काळात राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला होता. अनेक धरणांतून विसर्गही करण्यात आला. हंगामाच्या चार महिन्यांमध्ये काही भागांत अतिवृष्टीही झाली. परतीच्या पावसाचा प्रवास यंदाही काही काळ लांबला. महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरपासून पावसाने परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २२ ऑक्टोबपर्यंत आणि त्यापूर्वीही राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागांत शेतीचे नुकसान झाले. मात्र, दुसऱ्या बाजूला धरणे काठोकाठ भरली.

यंदा नाशिक विभागात मोठय़ा पावसाची नोंद झाली. परिणामी या विभागातील धरणांमध्ये तब्बल ९९.५३ टक्के पाणी आहे. त्यापाठोपाठ अमरावती विभागातील प्रकल्पांत ९८.६८ टक्के, औरंगाबाद विभागात ९७.५७ टक्के, पुणे विभागात ९७.३५ टक्के, कोकण विभागात ९६.५२ आणि नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ८९.२२ टक्के पाणीसाठा आहे.

गेल्या दोन वर्षांतही पाऊस लांबला असला, तरी या वर्षीच्या तुलनेतही यंदा धरणांतील पाणीसाठा अधिक आहे. २०१९ आणि त्यापूर्वीच्या वर्षांमधील पाणीसाठा आणि सध्याच्या पाणीसाठय़ात, तर मोठी तफावत दिसून येत आहे.  यंदा पाऊस ऑक्टोबर अखेपर्यंत लांबल्याने उन्हाचा तीव्र चटकाही टळला. त्यामुळेही पाणीसाठा टिकून राहण्यास मदत झाली आहे.

आनंदाची बाब..

नाशिक विभागात सर्वाधिक ९९ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती विभागांतही ९६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा आहे. त्यामुळे राज्य पाण्याच्या चिंतेपासून मुक्त आहे.

मोठय़ा प्रकल्पांतही समाधानकारक..

१ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १०२ टक्के अधिक आणि विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यातून सर्वच मोठे प्रकल्प पूर्णपणे भरले. कोयना, उजनी, जायकवाडी आदींसारखे अवाढव्य प्रकल्पही पूर्णपणे भरल्याने विसर्ग करावा लागला.

दुरुस्तीकामामुळे मुंबईठाणेभिवंडीत तूर्त कपात

मुंबई पालिकेच्या पिसे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दुरूस्तीमुळे मुंबईसह ठाणे, भिवंडीत १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. दहा दिवस ही पाणीकपात लागू असून, त्यानंतर मात्र नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

चटका टळल्यानेही..

गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही ऑक्टोबरमध्ये अगदी शेवटच्या आठवडय़ापर्यंत उन्हाचा तीव्र चटका जाणवला नाही. त्यातूनही पाणीसाठय़ात घट टळली. त्यामुळे ऑक्टोबरअखेरीसही अनेक धरणे तुडुंब भरलेली राहिली.

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा

वर्षे     मोठे प्रकल्प     सर्व प्रकल्प

२०१८   ६५.७४%       ५९.०७%

२०१९   ८९.७२%       ७८.२२%

२०२०   ९४.८३%       ८५.८३%

२०२१   ९४.६३%       ८९.४६%

२०२२   ९६.७५%       ९१.४१%.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button