ताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांसाठी खास ऑफर, आता फक्त १० रुपयांत फिरा पुणे आणि पिंपरी-चिंचवड

पुणे |  पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वर्धापनदिनानिमित्त १९ एप्रिल रोजी पुणेकरांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पाच आणि दहा रुपयांमध्ये फिरता येणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी पीएमपी बसने प्रवास करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

‘पीएमपी’चा १५ वा वर्धापनदिन १९ एप्रिल २०२२ रोजी आहे. त्यानिमित्त ‘पीएमपी’ने ‘बस डे’सह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी ‘पीएमपी’च्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यास हातभार लावावा, या उद्देशाने १८ एप्रिलला ‘बस डे’चे आयोजित केला आहे; तसेच १९ एप्रिलला वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास सुविधा देण्यात येणार आहे. ही सुविधा पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात सेवा दिली जाणार आहे. या अंतर्गत किमान तिकीट पाच रुपयांना, तर कमाल दर १० रुपये असेल. पुण्यदशम बस संपूर्ण दिवस मोफत राहणार आहेत. मात्र, दोन्ही महापालिका हद्दीबाहेरील प्रवासासाठी तिकीटदरात कोणताही बदल केला जाणार नाही.

‘बस डे’च्या दिवशी ‘पीएमपी’मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा आणि सुविधांची माहिती होण्याच्या दृष्टीने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला ‘पीएमपी’कडून माहितीपत्रक देण्यात येणार आहे. त्यामध्ये कूपन असणार आहे. प्रवाशांनी कूपनवर स्वतःचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, सेवेबाबतचा अभिप्राय लिहायचा आहे. त्यानंतर ते कूपन प्रत्येक बस किंवा बसस्थानकामध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा करावे. त्यामधून ‘लकी ड्रॉ’ काढून विजेत्या प्रवाशांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत.

वाहतुकीची विशेष योजना

‘बस डे’च्या दिवशी १८०० बस प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गावर आणण्यात येणार आहेत. कोथरूड डेपो ते डेक्कन, स्वारगेट ते वडगाव-धायरी फाटा, स्वारगेट ते शिवाजीनगर (बाजीराव/शिवाजी रस्तामार्गे), जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) या पाच मार्गांवर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ‘डेडिकेटेड लेन’द्वारे सेवा दिली जाणार आहे.

महिलांसाठी २० एप्रिलला दिवसाचा पास – १०

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये महिला प्रवाशांसाठी २० एप्रिलला सवलतीच्या दरात दैनिक पास दिला जाणार आहे. या पाससाठी केवळ १० रुपये आकारले जाणार आहेत. मात्र, दोन्ही महापालिका हद्दीबाहेरील प्रवासासाठी ही सवलत नसेल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button