breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

Cyclone Tauktae : अरबी समुद्रात ९३ जण बेपत्ता

मुंबई – ‘तौक्ते’ चक्रीवादळाने रौद्ररूप धारण केल्याने अरबी समुद्र प्रचंड खवळला होता. त्यात ७०७ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले तीन तराफे आणि एक तेलफलाट भरकटले. या तीन तराफ्यांसह एका तेलफलाटावरील एकूण ३१७ कर्मचाऱ्यांची नौदल आणि तटरक्षक दलाने मंगळवारी सुखरूप सुटका केली. मात्र अद्याप ३९० कर्मचारी अडकलेले असून त्यातील २९७ कर्मचारी सुरक्षित असल्याचे भारतीय संरक्षण दलांकडून स्पष्ट करण्यात आले असल्याने उर्वरित ९३ कर्मचारी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

नौदलाच्या माहितीनुसार, पी ३०५ तराफ्यातील २७३, गॅल कन्स्ट्रक्टरमधील १३७, एसएस-३ मधील १९६ आणि सागर भूषण तेलफलाटावरील १०१ असे एकूण ७०७ कर्मचारी खवळलेल्या अरबी समुद्रात अडकले होते. त्यापैकी ९३ कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. ओएनजीसीच्या सेवेत असलेल्या ‘पी ३०५’ तराफ्यातील २७३ पैकी १८० कर्मचाऱ्यांची मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुटका करण्यात आली. तसेच गॅल कन्स्ट्रक्टर तराफ्यातील सर्व १३७ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. तटरक्षक दलाच्या दोन चेतक हेलिकॉप्टर्सच्या मदतीने या १३७ कर्मचाऱ्यांना किनाऱ्यावर आणण्यात आले. ‘पी-३०५’ तराफा मुंबईपासून समुद्रात सुमारे ३५ सागरी मैल अंतरावर बुडाला. या तराफ्यातून १८० जणांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, समुद्रात वेगवान वाऱ्यामुळे नौदलाला बचावकार्य राबविण्यात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसात सोमवारी मध्यरात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. गेल्या चार दशकांतील हे सर्वात अवघड मदतकार्य आहे. अंधार, ८ ते १० मीटर उंच लाटा, वेगवान वारा यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. मंगळवारी सकाळपासून मदतकार्यात हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. आयएनएस तलवार, आयएनएस बेटवा, आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता या युद्धनौका शोध आणि मदतकार्यात दाखल झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करेपर्यंत ही मोहीम सुरू राहील, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button