ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांवर आता वीज दरवाढीचे संकट

महागाईने त्रस्त नागरिकांना बसणार शॉक

मुंबई | वाढती वीज मागणी आणि टंचाईमुळे कोळसा महाग झाल्याचा फटका येत्या का‌ळात बसण्याची शक्यता आहे. ‘इंधन समायोजन आकार’ म्हणून असलेल्या शुल्कात वाढ होऊन महागड्या विजेचे बिल मुंबईकरांना भरावे लागणार आहे. वीज वितरण कंपन्या उत्पादकांकडून वीज खरेदी करून त्याचा ग्राहकांना मागणीनुसार पुरवठा करतात. वीजनिर्मिती कंपन्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार वितरण कंपन्यांकडून शुल्क आकारतात. हे शुल्क वितरण कंपन्या ‘इंधन समायोजन आकार’नुसार ग्राहकांकडून वसूल करतात. मागीलवर्षी ऑगस्टनंतर देशभरात कोळसा टंचाई होती. त्यामुळे मुंबईला वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांना कोळसा आयात करावा लागला. या आयातीत कोळशाचे दर स्वदेशी कोळशापेक्षा २०० टक्के अधिक होते. त्यामुळेच ‘इंधन समायोजन आकार’ अंतर्गत दरवाढ करण्याची तयारी वीज वितरण कंपन्यांनी केली होती. परंतु करोना संकटामुळे हा आकार वसूल आकरण्यावर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मार्च २०२२पर्यंत निर्बंध लावले होते. आता १ एप्रिलपासून हा आकार लावून दरवाढ करण्याची मुभा वीज वितरण कंपन्यांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबईतील तिन्ही वीज वितरण कंपन्यांची वीज महागण्याची दाट चिन्हे आहेत.

संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईला तीन कंपन्या वीज वितरण करत असल्या तरी वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या अदानी व टाटा याच आहेत. यापैकी ३० लाख ग्राहकांसाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) कंपनी त्यांच्या ५०० मेगावॉट क्षमतेच्या डहाणू प्रकल्पात ८० टक्के देशांतर्गत कोळसाच वापरला जातो. २० टक्के आयातीचा कोळसा वापरल्याने त्यांचा खर्च वाढला आहे. तर टाटा पॉवर व बेस्ट या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना प्रामुख्याने टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील औष्णिक प्रकल्पातून विजेचा पुरवठा होतो. या प्रकल्पासाठी १०० टक्के इंडोनेशियाहून आयात होणारा कोळसा वापरला जातो. हा कोळसा महागल्याचा मोठा परिणाम बेस्ट व टाटाच्या सुमारे १८ लाख ग्राहकांना बसू शकतो.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २०२०-२१ ते २०२४-२५ या पंचवार्षिक दर निश्चितीवेळी टाटा पॉवरने कोळशापोटी जवळपास ६,८०० रुपये प्रति टन खर्चास मंजुरी दिली होती. पण एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान टाटा पॉवरला सरासरी ९ ते १० हजार रुपये प्रति टन दराने कोळसा खरेदी लागला. एईएमएलला ५,८०० रुपये प्रति टन खर्च मंजूर करण्यात आला होता. त्यांचा सरासरी कोळसा खर्च जवळपास तेवढाच राहिला. यामुळे लवकरच टाटा पॉवरकडून १.१० रुपये तर एईएमएलकडून २५ पैसे प्रति युनिट इतकी दरवाढ होऊ शकते, असे एका अहवालातून समोर आले आहे.

कोळसा महागल्याने वीजदरवाढीच्या शक्यतेवर हरित ऊर्जा हा सक्षम पर्याय असल्याचे दोन्ही कंपन्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ला सांगितले. ‘आम्ही डहाणूचा प्रकल्प पूर्णपणे देशांतर्गत कोळशावर चालवत आहोत. तर ७०० मेगावॉट वीज हरित ऊर्जा स्रोतांकडून खरेदी करत आहोत. याद्वारे ग्राहकांवर भार येऊ न देणाऱ्या दरांचा प्रयत्न असेल’, असे एईएमएलने स्पष्ट केले. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर कोळसा किमती वधारल्याचा वीज खरेदीच्या किमतीवर परिणाम झाला आहे. पण मुंबईत औष्णिकसह १८० मेगावॉट वायू, ४४० मेगावॉट जलविद्युत व ३५० मेगावॉट हरित ऊर्जा स्रोतांकडून वीज पुरवली जाते. या मिश्रणातूनच दरवाढ टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे टाटा पॉवरने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button