breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रावर पुन्हा लोडशेडिंगचे संकट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

मुंबईः उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची अधिक गरज असतानाच आजपासून महाराष्ट्रात लोडशेडिंगची घोषणा करण्यात आली आहे. विजेची वाढती मागणी, त्यात कोळसा टंचाईमुळे महानिर्मितीचे घटलेले उत्पादन आणि बाहेरून खरेदी करावी लागणारी महागडी वीज, यामुळे राज्यातील काही भागात भारनियमन जाहीर केले आहे. मंगळवारपासून मुंबई, ठाणे, नवीमुंबई वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांना लोडशेडिंगचा फटका बसणार आहे.

ज्या भागात वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे अशा भागात भारनियमनचा निर्णय घेण्यात आला आहे. भांडूप- मुलंड, ठाणे आणि नवी मुंबई याभागात वीजेची मागणी कमी आहे. तसंच, इतर भागांच्या तुलनेत वीज बिलाची वसुलीही नियमित होते. त्यामुळं या भागात भारनियमन करणार नाही, अशी माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ज्या ठिकाणी वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे अशा ठिकाणी आम्ही लोडशेडिंग करू. यामध्ये G1, G2 आणि G3 श्रेणीतील ग्राहकांचा समावेश आहे, जे बहुतांशी मुंबई महानगर भागातील कल्याण भागात आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश जिल्ह्यातील नागरिकांना लोडशेडिंगचा फटका बसणार आहे. काही शहरी भागात जरी आम्ही भारनियमन करत असू तरी दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवू, असंही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, राज्यात ऊन तापत असल्याने घरगुती वीज वापरासह औद्योगिक व कृषिपंपाचा वीजवापरदेखील वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी विक्रमी २८ हजार मेगावॉटच्या घरात गेली आहे. मुंबईत सुमारे ३२०० ते ३५०० मेगावॉट विजेची मागणी आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत चार हजार मेगावॉटने वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपासून ‘महावितरण’कडील विजेची मागणी सातत्याने २४ हजार ५०० ते २४ हजार ८०० मेगावॉट दरम्यान आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी लवकरच २५ हजार ५०० मेगावॉटवर जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी रात्रीच्या कालावधीतदेखील मागणी २२ हजार ५०० ते २३ हजार मेगावॉट आहे, असे ‘महावितरण’ने म्हटले आहे.

वीजबचतीचे आवाहन

‘महावितरण’ला सध्या २५०० ते ३००० मेगावॉट विजेच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या निकषांप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील काही वीजवाहिन्यांवर आगामी काळात नाईलाजास्तव अधिकचे भारनियमन करावे लागू शकते. हे टाळण्यासाठी वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button