ताज्या घडामोडीमुंबई

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ‘श्रीमंत’ मजूर प्रवीण दरेकरांवर गुन्हा

मुंबई | मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ‘श्रीमंत’ मजूर प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस मजूर असल्याचे दाखवून दरेकरांनी अनेक वर्षे सरकार, मुंबई बँक आणि खातेदारांची फसवणूक केली, अशी तक्रार आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे दरेकरांच्या अडचणींत वाढ झाली आहे. दरम्यान ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असे सांगत भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न असल्याचे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपामध्ये हा बोगस श्रीमंत मजूर आहे. त्यामुळे त्याची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी शिंदे यांनी विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे प्रतिज्ञा मजूर संस्थेचे ‘मजूर’ आहेत. या संस्थेत ते ‘रंगारी’ असल्याची कागदोपत्री नोंद आहे. या प्रवर्गातून त्यांनी अनेक वर्षे मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असतानाही मुंबई बँकेचे अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९-२० या काळात दरेकर आणि त्यांच्या टोळीने जवळपास २,००० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. अनेक नियमबाह्य कामे केली. हा प्रकार सहकार विभागाची चौकशी आणि लेखापरीक्षण अहवालात उघड झाला आहे. त्यामुळे कोणताही ‘पेन ड्राईव्ह’ न देता आम्ही थेट अहवालच देण्यास तयार आहोत. म्हणून आता तरी दरेकरांना भाजपाने नारळ द्यावा, अशी मागणी आपने केली आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असे सांगत भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा केली होती. तेव्हा त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी दरेकर यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी. अन्यथा मोदी यांची भूमिका महाराष्ट्रातील भाजपाला मान्य नाही, असा चुकीचा संदेश सामान्य लोकांमध्ये जाईल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाने २ वर्षांपूर्वीच दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या बोगस मजुराने मुंबई बँकेच्या हजारो ठेवीदार व सहकार विभागाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सहकार विभागाचे सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनीही मजूर म्हणून प्रवीण दरेकरांना अपात्र घोषित केले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाबही नोंदवला. सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. त्यामुळे याबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून मागणी लावून धरली. त्यामुळे दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०१५ पासून नाबार्डच्या प्रत्येक अहवालात मुंबई बँकेतील अनियमितता आणि घोटाळ्यांवर ठपका ठेवला आहे. २०१३ला सहकार विभागाने केलेल्या चौकशीत मुंबई बँकेच्या संचालक मंडळाने बँकेची आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याचे आढळले होते. त्यावेळीही त्यांनी कारवाईची शिफारस केली होती. मात्र त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button