ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

विश्वासार्हता, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांना उत्तम सेवा पुरवणारी बँक हीच प्रेरणा बँकेची ओळख

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे प्रतिपादन

पिंपरी : विश्वासार्हता, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांना उत्तम सेवा पुरवणारी बँक हीच प्रेरणा बँकेची ओळख आहे. सहकारात सांघिक कार्यपद्धती आणि विश्वासार्हता महत्त्वाची असते, ही भावना प्रेरणा बँकेत प्रामुख्याने आढळते, म्हणूनच बँकेने अल्पावधीत मोठी भरारी घेतली आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळ वाढली पाहिजे, टिकली पाहिजे. तितकीच ती रुजलीही पाहिजे. सहकारात काम करणाऱ्या प्रत्येकाचीच ती जबाबदारी आहे. असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ते प्रेरणा बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक तुकाराम गुजर होते. याप्रसंगी चेअरमन कांतीलाल गुजर, माजी आमदार विलास लांडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, संतोष बारणे, कैलास बारणे, मनोहर पवार, सतिश दरेकर, विक्रांत लांडे, संदीप चिंचवडे, काळूराम बारणे, बँकेचे व्हाईस चेअरमन श्रीधर वाल्हेकर, संचालक गबाजी वाकडकर, सुरेश पारखी, संजय पठारे, संतोष मुंगसे, अक्षय गुजर, नाना शिवले, सी.ए.नंदकिशोर तोष्णीवाल, ॲड. अजितकुमार जाधव, राजाराम रंदिल, राजेंद्र शिरसाठ, सुजाता पारखी, चंद्रभागा भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे, ज्ञानेश्वर खानेकर , शहाजी रानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजितदादा पुढे म्हणाले की, स्थापनेपासूनच तुकाराम गुजर, कांतीलाल गुजर व सर्व संचालक मंडळाने प्रेरणा बँकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधांचा वापर करणे, त्याचा प्रचार, प्रसार करणे आणि मूलभूत बदलांची माहिती ग्राहकांना देणे, कर्मचाऱ्याना अधिकाधिक प्रशिक्षणे देणे या सर्व गोष्टी बँकेने केल्या आहेत. म्हणूनच बँक नावारूपाला आली आहे. प्रेरणा बँकेने मागील पंचवीस वर्षांच्या काळात खूप चांगले काम केले आहे. चांगल्या कामामुळे प्रेरणा बँकेचा सहकारात चांगला नावलौकिक आहे. आर्थिक संस्था चांगल्याच चालवल्या पाहिजेत. असेह सांगत ज्या बँकेतील संचालक मंडळ, पदाधिकारी आणि कर्मचारी चांगले काम करतील त्याच बँका भविष्यात टिकणार आहेत. अन्यथा अनेक बँका रसातळाला गेल्याचे आपणाला माहिती आहे, ही सुद्धा त्यांनी आठवण करून दिली. बँकेचा संचालक होणे, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. संचालक पद हे मिरवण्यासाठी किंवा पत्रिकेत लिहिण्यापुरते नसते, तर ते एक जबाबदारीचे पद आहे. संचालक व्हायचं असेल तर वेळ देता आला पाहिजे. चांगले निर्णय घेता यायला पाहिजे. बँक कामकाजाचा, वाटचालीचा आणि व्यवसायाचा अभ्यास असला पाहिजे. ग्राहकाच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. बँकेच्या प्रगतीला हातभार लावता यायला पाहिजे. कोणतीही संस्था अथवा क्षेत्र असो. संचालक पद हवे असेल तर वेळ देता आला पाहिजे. ठेवीदारांनी आपल्या विश्वासावर बँकेत ठेवलेल्या पैशाचा विनियोग करणे ही बँकेतील सर्वांचीच महत्वाची जबाबदारी आहे. असेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी संस्थापक तुकाराम गुजर यांचा अजितदादांच्या हस्ते प्रेरणा बँकेच्या संचालक मंडळ व सेवकांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.

बँकेच्या स्थापनेपासून २५ वर्ष सेवापूर्तीबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे, व्यवस्थापक भास्कर काळोखे, प्रतिभा क्षीरसागर, किरण गायकवाड, पोपट बिरदवडे व राजेंद्र शेलार यांना प्रेरणा सेवा गौरव या पुरस्काराने अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या पंचवीस वर्षाचा आढावा घेत एकूण प्रवास सांगितला. समाजातील प्रत्येक घटक अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात यावा, त्याला समाज जीवनात उभे राहता यावे, यासाठी प्रेरणा बँक कार्य करत आहे. सहकाराची गरज ओळखून तुकाराम गुजर यांनी स्थापन केलेली प्रेरणा बँक ही एक आदर्श बँक आहे. २५ वर्षांच्या कालावधीत बँकेने दिलेली सेवा, सुविधा आणि नव्या तंत्रज्ञानाचा केलेला प्रभावी वापर यामुळे बँकेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात ग्राहक, सभासद यांच्यासाठी अनेक उपक्रम बँकेमार्फत राबविले गेले आहेत. सध्या बँकेच्या १५ शाखा असून आजपर्यंत बँकेने ६८० कोटींचा व्यावसायिक टप्पा पूर्ण केला आहे. १००० कोटींचा व्यावसायिक टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून बँकेच्या यशस्वी वाटचालीत सर्व संचालक मंडळ, ठेवीदार, भागधारक, खातेदार व कर्मचारी यांचे विशेष योगदान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button