breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

#Covid-19: पिंपरी-चिंचवड मनपाची महापालिका स्तरावर फील्ड सर्व्हेलन्स टीमची स्थापना…; असे, असणार फिल्ड सर्व्हेलन्स टीमचे कार्य!

पिंपरी |

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका ओळखून कोरोना बाधितांच्या अलगीकरण तसेच संस्थात्मक विलगीकरण संबंधित शासन मार्गदर्शक सुचनांनुसार कामकाज करण्यासाठी महापालिका स्तरावर फील्ड सर्व्हेलन्स टीमची स्थापना करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत. या टीममध्ये पीएमपीएमएलकडील कर्मचारी आणि महानगरपालिकेतील सुमारे ४९६ शिक्षकांच्या रुग्णालय निहाय नेमणूका करण्यात आल्या आहेत. कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित झालेपासून एक महीना कालावधीसाठी या नेमणूका असतील. नियुक्त कर्मचा-यांचे रुग्णालय निहाय आदेश तयार करणेत आलेले आहेत. या कर्मचा-यांना संबंधित रुग्णालय प्रमुख, वैद्यकीय अधिका-यांनी रुग्णालय स्तरावर कामकाजाची परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण देऊन कामकाज करुन घ्यायचे आहे असे आदेशात नमूद केले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर काम करणा-या या टीममध्ये १ शिक्षक अथवा लिपिक कर्मचारी,१ पीएमपीएमएल कर्मचारी आणि १ पॅरामेडीकल कर्मचारी अशा तीन कर्मचा-यांचे पथक असणार आहे. महापालिकेची सर्व रुग्णालये आणि क्षेत्रीय कार्यालय यांना या टीम उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये महानगरपालिकेच्या विविध शाळांतील सहाय्यक शिक्षक, उपशिक्षक तसेच संगीत शिक्षकांसह पीएमपीएमएल कडील कर्मचा-यांचा समावेश आहे.

रुग्णालयनिहाय तपासणी केंद्रावर नागरिकांची कोरोना चाचणी झाल्यानंतर प्राधान्याने २२ ते ४४ वर्षे वयोगटातील पॉझिटीव्ह लक्षणे असणा-या आणि लक्षणे नसणा-या रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण सेंटर मध्ये रुग्णालय प्रमुखांच्या शिफारशीने दाखल केले जाईल. अशी कार्यवाही करताना संस्थात्मक विलगीकरण संबंधित शासन मार्गदर्शक सूचनांनुसार स्वतंत्र खोली, टॉयलेट बाथरुम इत्यादी बाबींची खातरजमा करुन त्यांच्या हातावर होम आयसोलेशनचा शिक्का मारुन त्या नागरिकास होम आयसोलेशनची परवानगी दिली जाणार आहे. उर्वरीत पॉझिटीव्ह रुग्णांना महापालिकेच्या कोवीड केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण सेंटर मध्ये कटाक्षाने भरती करण्यात येईल. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पॉझिटीव्ह रुग्णांचे कंटेन्मेंट झोन तयार करुन अशा झोनला स्टीकर लावणे, सोसायट्यांच्या बाहेर फलक लावणे, १४ दिवसानंतर हा कंटेन्मेंट झोन फ्री करणे, संबंधित सोसायटीचे सचिव आणि अध्यक्षांना त्यांच्या सोसायटीतील पॉझिटीव्ह रुग्ण बाहेर फिरणार नाहीत याबाबत ताकीद देणे याबाबतचे कामकाज गांभीर्याने करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात रिक्षाद्वारे तसेच आरोग्य विभागाच्या कचरावेचक गाड्यांद्वारे जनजागृती करुन पॉझिटीव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास तसेच विनाकारण नागरिक फिरताना आढळल्यास अशा नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात येतील अशी जनजागृती प्रभावीपणे करावी, आदी सूचना संबंधित अधिकारी कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शासनाच्या नव्याने निर्गमीत करण्यात आलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार कोरोना बाधित रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या व्यक्ती तसेच आयसोलेशनबाबत झोनल समन्वय अधिका-यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि विभागीय रुग्णालयांशी चर्चा करुन नियोजन करावे असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

वाचा- एक वर्षापासून शाळा बंद असताना ‘वॉटर फिल्टर’ खरेदी कशा साठी ?- नाना काटे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button