breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: “नरेंद्र मोदींना भारतातलं करोनाचं संकट रोखता आलं असतं, पण…”, आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोदींवर परखड टीका!

नवी दिल्ली |

देशभरात करोनाचं संकट थैमान घालू लागलं आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. दुसरीकडे रेमडेसिविर आणि खुद्द करोनाच्या लसीचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला असताना १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर देशात विरोधकांकडून आणि काही तज्ज्ञांकडून टीका केली जात असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारतातील करोनाची परिस्थिती गंभीर होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं आहे.

  • “करोना संकटामुळे मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला”

अमेरिकेतील आघाडीचे वर्तमानपत्र असलेल्या न्यू यॉर्क टाईम्सने म्हटल्यानुसार, “आरोग्य तज्ज्ञांनी या परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अती आत्मविश्वास कारणीभूत ठरल्याचं म्हटलं आहे. मोदींचा अतीआत्मविश्वास आणि त्यांच्या नेतृत्वाची डॉमिनेटिंग शैली ही सर्वाधिक जबाबदार आहे. करोनाचं संकट असून देखील मोदींच्या प्रशासनाचा प्रयत्न हाच होता की भारताची पुन्हा सुस्थितीत आणि सारंकाही सुरळीत झालं आहे, अशी प्रतिमा तयार केली जावी.”

  • “भारत ऑक्सिजनसाठी हवालदील झाला असताना राजकारणी मात्र…”

द गार्डियनने प्रकाशित केलेल्या स्तंभामधून ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे. “भारतात ऑक्सितजनचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असताना, लोक ऑक्सिजन अभावी मरत असताना अनेक राजकीय नेते मात्र त्याविषयी आवाज उठवणाऱ्यांवरच दबाव टाकत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन तुटवड्याविषयी आवाज उठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. कारण त्यांच्यामते ऑक्सिजनचा तुटवडा नाहीच आहे”, असं या स्तंभा म्हटलं आहे. “उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ऐन करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यावर जगातला सर्वात मोठा नदीकिनारी होणारा धार्मिक सोहळा, कुंभमेळा, भरवण्यास परवानगी दिली. त्यांच्या या निर्णयाला पंतप्रधानांचीही मंजुरी होती”, असं देखील यात म्हटलं आहे.

  • “पंतप्रधानांना संकट रोखता आलं असतं!”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना करोनाचं हे संकट रोखता आलं असतं, पण तज्ज्ञ म्हणतात त्यांनी ते रोखलं नाही”, अशा शब्दांत सीएनएननं मोदींवर निशाणा साधला आहे. “१७ एप्रिल रोजी भारतात २ लाख ६१ हजार नवे करोनाबाधित सापडले. पण त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर निवडणुकीच्या प्रचारसभेत मास्क न घालता सांगत होते की मी एखाद्या सभेमध्ये इतकी गर्दी कधीच पाहिली नाही”, असं या स्तंभात म्हटलं आहे.

  • “पंतप्रधान मोदी जबाबदारी घेत नाहीत, तोपर्यंत चिता जळत राहतील”

ब्रिटनच्या फायनान्शियल टाईम्सने छापलेल्या ‘द ट्रॅजेडी ऑफ इंडियाज सेकंड वेव्ह’ या लेखामध्ये तर इशाराच देण्यात आला आहे की, ‘जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी या संकटकाळासाठीची त्यांची जबाबदारी घेत नाहीत, तोपर्यंत देशभर अशाच चिता जळत राहतील. ऑक्सिजनअभावी लोक रुग्णालयाबाहेरच जीव तोडत असल्याची दृश्य ही करोनाचं संकट सुरू झालं तेव्हा वर्तवण्यात आलेल्या भीषण स्वरूपाचंच प्रतिरूप आहे.’

  • ‘मोदींच्या दृरदृष्टीचा अभावच या संकटासाठी कारणीभूत ठरला!’

फ्रेंच वर्तमानपत्र असलेल्या ला माँडेमध्ये छापून आलेल्या संपादकीयामध्ये मोदींच्या दृरदृष्टीविषयी टिप्पणी करण्यात आली आहे. ‘मोदींच्या दूरदृष्टीचा अभाव, अभिमान या गोष्टी देशात करोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. २०२०मध्ये करोना संकटादरम्यान लॉकडाउन लागू करून पंतप्रधानांनी गरीब आणि स्थलांतरीत मजुरांवर मोठं संकट लादलं होतं. त्याच पंतप्रधानांनी आता आपली सर्वच शस्त्र खाली ठेवली आहेत’, असं यात म्हटलं आहे.

  • ‘फक्त मोदीच नाही, तर भारतीय माध्यमांनीही जबाबदारी घ्यावी’

टाईम मॅगझिनमध्ये छापून आलेल्या संपादकीयामधून भारतीय प्रसारमाध्यमांवर देखील टीका करण्यात आली आहे. ‘देशातील अनेक हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्या, प्रादेशिक भाषेतील वाहिन्यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या यशाचं अतिशयोक्तीपूर्ण वृत्तांकन केलं आहे’, असं यात नमूद करण्यात आलं आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी भारताने २४ तासांत जगभरात सर्वाधिक ४ लाख १ हजार रुग्णवाढ नोंदवली आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ लागला असून रुग्णांवर उपचार होणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं आहे.

वाचा- “पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास रक्तरंजित,” हिंसाचारावर खासदार संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button