breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्या- पंतप्रधान

नवी दिल्ली |

करोना विषाणूचा धोका कमी झालेला नसून अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले आहे. त्यांनी सांगितले, की २१ जून रोजी सर्वाधिक लसीकरण झाले असून आता प्रौढांनाही मोफत लस दिली जात आहे. लस न घेण्याची प्रवृत्ती लोकांनी टाळली पाहिजे, असे आवाहन करून ते म्हणाले, की अजून करोनाचा धोका कायम आहे. मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील दुलारिया खेडय़ातील रहिवाशांशी त्यांनी संपर्क साधला, त्यांना समुपदेशन करून लस घेण्यास सांगितले. लशीबाबत कुठल्याही शंका बाळगण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण व आपल्या शंभर वर्षांच्या मातेने लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असून वैज्ञानिक व विज्ञान यावर विश्वास ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका असे त्यांनी सांगितले. जर कुणाला करोना गेला असे वाटत असेल तर तो भ्रम आहे असे सांगून ते म्हणाले, की करोना हा छुप्या रूपात आहे, तो सतत त्याची रूपे बदलत आहे. त्यात उत्परिवर्तने होत आहेत. त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे करोना नियमांचे पालन करा. मुखपट्टीचा वापर करा, वारंवार साबणाने हात धुवा, सामाजिक अंतर राखा, दुसरा मार्ग म्हणजे लसीकरण करून घ्या कारण ते सुरक्षा कवच आहे.

२१ जूनला एकाच दिवसात ८६ लाख लोकांना लस देण्यात आल्याचे कौतुक करून ते म्हणाले, की सरकारने आता सर्वच प्रौढांसाठी लसीकरण मोफत केले आहे. ३१ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. करोना काळात डॉक्टरांनी मोठे योगदान दिले आहे. यंदाचा डॉक्टर दिन त्यामुळे विशेष आहे. कोविडमुळे मरण पावलेले सरकारी सचिव गुरुप्रसाद मोहपात्रा यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी सांगितले, की मोहपात्रा यांनी प्राणवायू उपलब्धता व पुरवठय़ासाठी अहोरात्र काम केले. करोनाशी सामना करीत असतानाही त्यांनी समाजासाठी काम केले. करोनाने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले. अनेक लोकांच्या मृत्यूची चर्चाही झाली नाही, त्या प्रत्येक कोविड बळीला आपण लसीकरण करून घेऊन श्रद्धांजली वाहावी. आगामी काळ पावसाळ्याचा आहे असे सांगून ते म्हणाले, की पाण्याचे संवर्धन करून देशाची सेवा केली पाहिजे. उत्तराखंडमधील पावरी गढवाल भागातील सच्चिदानंद भारती हे शिक्षक असून मेहनती आहेत. त्यांनी उत्तराखंडमधील भागात जलसंवर्धन करून पाण्याचा प्रश्न मिटवला आहे.

  • ‘खेळाडूंवर दबाव नको’

या वेळी पंतप्रधानांनी भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.अ‍ॅथलिट्सनी ऑलिंपिकमध्ये केलेल्या कामगिरीचा गौरव करून मोदी म्हणाले, की या खेळाडूंना मोठा संघर्ष करावा लागत असतो, त्यांच्यावर लोकांनी दडपण ठेवू नये. टोक्योत जे अ‍ॅथलिट जाणार आहेत ते कठोर परिश्रम करीत आहेत. देशासाठी ते खेळतात. जिंकण्याची उमेद त्यांच्यात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button