breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: प्राणवायू तुटवडा असल्याने अत्यवस्थ रुग्णांची तडफड

  • प्राणवायू तुटवडा असल्याने खासगी रुग्णालयांकडून उपचारास नकार

पालघर |

३० मेट्रिक टनाची प्राणवायूची गरज असताना जिल्ह्याला फक्त २५ टन प्राणवायू पुरवठा होत आहे. त्यामुळे दररोज पाच मेट्रिक टन पुरवठा कमी असल्याने दररोज काही रुग्णालयांना गरजेपेक्षा कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे जास्त प्राणवायूची गरज असलेल्या करोना रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून खाटा नसल्याचे कारण सांगत प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची परवड होत आहे. जिल्ह्यात ३७हून अधिक खासगी समर्पित करोना रुग्णालय तसेच १० शासकीय करोना रुग्णालयांत करोना रुग्णांवर उपचार होत आहेत. या सर्व रुग्णालयांतील प्राणवायू खाटा, अतिदक्षता व जीवरक्षक प्रणालीच्या खाटा मिळून ३० मेट्रिक टन प्राणवायूची जिल्ह्य़ाला आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने शासनाला कळविले होते.

मात्र शासनाने पालघरसाठी दररोज २५ मेट्रिक टन प्राणवायूचा साठा मंजूर केला आहे. त्यानुसार हा पुरवठा होत आहे. मात्र दररोज पाच टन इतका प्राणवायू कमी मिळत असल्याने या सर्व रुग्णालयांना त्याचे वाटप करताना तो कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार करताना प्राणवायूची कमतरता भासत आहे. उपचाराधिन रुग्णांचीच प्राणवायूची गरज भागत नसल्याने खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ रुग्णाला प्रवेश देण्यास नकार देत आहेत. प्राणवायू कमी पडल्यास रुग्ण दगावल्याचा धोका नको म्हणून खासगी रुग्णालयांकडून ही भूमिका घेतली जात आहे. तर असे रुग्ण दाखल करताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राणवायूची कमतरता भासल्यास इतरत्र हलवण्याची जबाबदारी नातेवाईकांवर सोपवण्यात येण्याबाबतच्या हमी पत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत.

  • औषध विक्रेत्यांवर राजकीय दबाव

जिल्ह्य़ात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने होत असून त्याचे वितरण संबंधित उत्पादन कंपनीचे वितरक करीत आहेत. जिल्ह्याने नेमून दिलेल्या कोटय़ाप्रमाणे इंजेक्शनचे वितरण करण्यात येत आहे. असे असले तरी औषध विक्रेत्यांवर आपल्याला इंजेक्शन पुरवठा करण्यासाठी राजकीय मंडळींचा दबाव येत असल्याचे सांगण्यात येत आहे. इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कंपनीने थेट रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी पालघर जिल्हा केमिस्ट संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नऊ खासगी रुग्णालयांना आज ५०४ रेमडेसिविरच्या पुरवठा करण्यात आला.

  • दुप्पट दर आकारणी

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात प्राणवायू सिलिंडर रिफिल करणारे दोन ठिकाणे असून बोईसर व कडूस येथील इतर दोन वितरकांकडून ग्रामीण भागात प्राणवायू पुरवठा केला जातो. या वितरकांना रायगड डोलवी तसेच मुरबाड तालुक्यातून प्राणवायूचा पुरवठा होत असून अनेक प्राणवायू उत्पादकांनी दरवाढ केल्याने तसेच वाहतूक करणाऱ्यांनी भाडे वाढविल्याने प्राणवायू दुप्पट दराने रुग्णालयांना उपलब्ध होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

* वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी सायंकाळी १५ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध झाला असून बोईसर येथे मंगळवारी पाच मेट्रिक टन प्राणवायू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसांपुरते तरी प्राणवायूचे संकट टळले आहे. जिल्ह्यातील सर्व करोना रुग्णालयांना प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी समन्वय साधत आहेत. आवश्यकता पाहून प्राणवायू उपलब्ध केला जात आहे.

– डॉ. किरण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी

वाचा- #Covid-19: मोठी बातमी! आता देशात १८ वर्षांवरील सर्वांना लस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button