breaking-newsTOP Newsआरोग्यमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: मोठी बातमी! आता देशात १८ वर्षांवरील सर्वांना लस

मुंबई |

करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवताना १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा सोमवारी केली. लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरू होणार असून, केंद्राने राज्ये, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना थेट निर्मार्त्यां कडून लसमात्रा खरेदी करण्यास मुभा दिली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने रुग्णवाढ होत असल्याने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्याची मागणी विरोधकांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली होती. अखेर ही मागणी मान्य करत केंद्राने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

केंद्राच्या नव्या लसीकरण धोरणानुसार लसनिर्माते मासिक ५० टक्के लशी केंद्र सरकारला तर उर्वरित ५० टक्के लशी राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विकू शकतात. त्यासाठी लसनिर्मात्या कंपन्यांना राज्यांना आणि खुल्या बाजारात विक्री करण्यात येणाऱ्या ५० टक्के लशींच्या किमती १ मेआधी जाहीर करणे आवश्यक आहे. त्याआधारे राज्य सरकारे, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापने लशींची मागणी नोंदवू शकतील. शासकीय केंद्रावरील लसीकरण यापुढेही सुरु राहणार असून, ते नि:शुल्क असेल. मात्र, लसनिर्मात्र्यांनी खुल्या बाजारात लसविक्री केल्यानंतर लसमात्रांची किंमत काय असेल, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

  • मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून, तसा निर्णय घेण्याची विनंती काही दिवसांपूर्वीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलत १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल. लशीचा पुरवठा वेळच्या वेळी होत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

  • लसप्रोत्साहनाचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली : करोनाविरोधातील लढ्यात लस हे सर्वांत मोठे अस्त्र आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आढावा बैठकीत डॉक्टरांना केले.

  • दिल्लीत सहा दिवस टाळेबंदी

नवी दिल्ली : दिल्लीत सोमवारी रात्री १० वाजल्यापासून २६ एप्रिलच्या सकाळी ५ वाजेपर्यंत सहा दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून त्यांच्यावरील उपचारांसाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

  • राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट

मुंबई : राज्यात सोमवारी करोनाचे ५८,९२४ रुग्ण आढळले, तर ३५१ जणांचा मृत्यू झाला. रविवारी राज्यात ६८ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले होते. या तुलनेत सोमवारी १० हजार कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. रविवारी चाचण्यांची संख्या कमी असल्याने रुग्णसंख्या कमी नोंदवल्याचे मानले जाते. राज्यात ६ लाख ७६ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

  • देशात दिवसभरात २,७३,८१० बाधित

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २,७३,८१० रुग्ण आढळले, तर १,६१९ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या १५ दिवसांत देशात २५ लाख रुग्णांची भर पडली आहे. सलग ४० व्या दिवशी रुग्णवाढीमुळे देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १९ लाखांहून अधिक झाली आहे.

  • मनमोहन सिंग यांना करोना

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सोमवारी करोनाची लागण झाली. सोमवारी सकाळी सौम्य तापानंतर त्यांची चाचणी केली असता, त्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना दिल्लीत ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाचा- मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणी व निधी वितरणाच्या आढाव्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button