breaking-newsमुंबई

#CoronaVirus: वरळी कोळीवाडय़ावर सावट

करोनाबाधित रुग्णांची संख्या थोपवण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान

मुंबई : मध्य मुंबईतील वरळी कोळीवाडा आणि परिसरात गेल्या चार दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेची यंत्रणा हादरून गेली आहे. हजारोंच्या संख्येने लोकवस्ती असलेला दाटीवाटीचा हा गावठाण भाग पालिकेने सोमवारी अक्षरश: चहुबाजूने ये-जा करण्यासाठी बंद केला. वरळी कोळीवाडय़ातील वाढती रुग्णसंख्या हा समूह संसर्गाचा टप्पा असल्याचे मानले जात आहे.

करोनाचा एखादा रुग्ण एखाद्या इमारतीत सापडला की ती संपूर्ण इमारत ताब्यात घेऊन रहिवाशांची ये-जा पूर्णपणे थांबवली जाते. प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. मात्र आता हा आजार वरळी कोळीवाडय़ासारख्या बैठय़ा आणि मोठी व्याप्ती असलेल्या वसाहतीत पोहोचल्यामुळे सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. चार दिवसांपूर्वी एक रुग्ण आढळला. मग आणखी दोन मिळाले आणि आता ही रुग्णसंख्या पाचवर गेली असून आणखी तीन संशयितांचे अहवाल यायचे आहेत. त्यामुळे एरव्ही गजबजलेला हा परिसर रविवारी मध्यरात्रीपासून अक्षरश: यंत्रणांनी ताब्यात घेतला. रविवारी मध्यरात्री पोलिसांनी ध्वनीक्षेपणावरून रहिवाशांना याबाबत सूचना दिल्या.

कोळीवाडय़ात अनेक गल्लय़ा असून बाहेर पडण्यासाठी तीन ते चार मार्ग आहेत. त्यामुळे कोळीवाडा बंद करणे हे पोलिसांसमोरही मोठे आव्हान होते. सध्या कोळीवाडय़ात जाणारा मुख्य रस्ता, नारायण हर्डीकर मार्गाकडून आत येणारा रस्ता, क्लीव्हलॅण्ड बंदराकडून येणारा रस्ता आणि झोपडपट्टीतून जाणारा छोटा रस्ता असे सगळे मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले आहेत. सोमवारी संपूर्ण दिवस कोळीवाडा बंद ठेवून येथे जंतुनाशक औषध आणि द्रावणाची फवारणी करण्यात आली.

कोळीवाडय़ात पाच रुग्ण, जवळच असलेल्या जनता कॉलनीत दोन रुग्ण, आदर्श नगरमध्ये एक रुग्ण आढळल्यामुळे सरकारी यंत्रणा हादरली आहे. मात्र कोळीवाडय़ात आत लोकांचा मुक्त संचार सुरू होता. पोलीस आणि सरकारी यंत्रणा सांगून थकल्यानंतर आता अखेर हा भाग पूर्ण बंद करण्यात आला आहे. या भागात आत जाण्याचीही आता पोलीस, पालिका कर्मचारी यांना भीती वाटते आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस हा भाग बाहेरून बंद केला तरी लोकांनी आत सुद्धा बंद पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे.

कोळीवाडय़ातून मासे विकायला बाहेर जाणाऱ्या कोळणींना आता मज्जाव करण्यात आला आहे. मात्र गेले काही दिवस या कोळणी मासेविक्री करत होत्या. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेपुढे मोठेच आव्हान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button