breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#NisargCyclone: रत्नागिरी जिल्ह्यात २७ हजार घरांचे नुकसान

चक्रीवादळामुळे महावितरणलाही मोठा फटका; वेगवान वाऱ्यांमुळे नारळ-पोफळीच्या बागांची वाताहात

रत्नागिरी जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे सुमारे २७ हजार घरांचे नुकसान झाले असून महावितरणलाही मोठा फटका बसला आहे.

बुधवारी पहाटेपासून वादळाचा जोर वाढला. जिल्ह्याच्या किनारी भागात त्याची तीव्रता जास्त होती. राजापूरला पहिला तडाखा बसला. त्यानंतर रत्नागिरी शहर आणि तालुक्यात घोंगावणारे वारे वाहू लागले. वादळाच्या टप्प्यात आलेली झाडे, घरांची छपरे यांसह इमारतीवरील पत्रे हवेत उडून जात होते.  रत्नागिरीमध्ये वाऱ्याचा वेग ७० ते ८० किलोमीटर वेग होता.

रत्नागिरी शहरासह, पूर्णगड, काळबादेवी, मालगुंड, वरवडे, जयगड, नांदिवडे, करबुडे, निवळी या भागात नुकसान झाले आहे. वादळामुळे विजेचे खांब उन्मळून पडत होते. वीज वाहिन्या रस्त्यावर पडलेल्या होत्या. अनुचित प्रकार टाळण्यासाठी महावितरणने वीजपुरवठा पहाटेच खंडित केला होता.

जिल्ह्यातील सुमारे २७ हजारांपेक्षा जास्त घरांचे या वादळामुळे नुकसान झाले आहे, असा अंदाज उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी वर्तवला असून नुकसानीचा एकूण आकडा काही कोटी रूपयांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून यद्धपातळीवर सुरु झाले आहे. विद्युत खांब, वीज वाहिन्या तुटल्यामुळे दोन्ही तालुक्यातील विजपुरवठा खंडित आहे. तो सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागतील, असा अंदाज आहे.

वादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे त्यापासून काही अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड,  दापोली,  गुहागर या तालुक्यांत चक्रीवादळाचे तांडव जास्त सहन करावे लागले आहे. गावेच्या गावे वेगवान वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे घरावरची कौले, पत्रा कागदासारखी उडून जमिनीवर कोसळत होती. अशा परिस्थितीत डोक्यावर छतच न राहिल्यामुळे या घरांमधील रहिवाशांनी सध्या मिळेल तेथे आसरा घेतला आहे.

दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्या काजू, आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. हर्णे बंदराजवळील नाडे गावातील सुमारे ८० घरांचे या वादळात नुकसान झाले. पाजपंढरीतील दोनजण वादळात जखमी झाले आहेत. जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदारांचे  मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील १४ रस्त्यांवरील वाहतूक, झाडे पडून बंद झाली होती. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. चिपळूण येथील शासकीय गोदामाच्या छतावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून अंशत: नुकसान झाले. मंडणगड- म्हाप्रळ रस्त्यावर झाडे हटवून रस्ता मोकळा करण्यात आले आहे.

या व्यतिरिक्त संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तीन तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.

जिल्ह्यात बुधवारी दुपारपर्यंत वादळाचा प्रभाव जाणवत राहिला. त्यानंतर तो ओसरला. वादळी वाऱ्यांबरोबर आलेल्या पावसानेही चांगलेच झोडपले. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरारसरी पाऊस ९३.४४ मिलीमीटर झाला.  त्यात लांजा १३१ मिलीमीटर, मंडणगड (१३०),  दापोली (१२५), चिपळूण (१०२), राजापूर (८७), गुहागर (७७), खेड (७६), संगमेश्वर (७३),  रत्नागिरी (४०) यांची नोंद आहे.

३० गावांतील वीजपुरवठा पूर्णत: बंद

वादळामुळे दापोली, मंडणगड आणि गुहागरमधील वीजपुरवठा पूर्णत: खंडित होता. १४ सबस्टेशन, ३० डीपी, १९६२ ट्रान्सफॉर्मर, सव्वातीन हजार विजेचे खांब आणि काही किलोमीटर वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. वादळानंतर तत्काळ कार्यवाही सुरु केली असून शुंगारतळीतील पुरवठा सुरळीत झाला आहे; मात्र दापोली, मंडणगडातील ३० गावांतील पुरवठा पूर्णत: बंद आहे. वीजपुरवठा सुरु होण्यासाठी किमान तीन दिवस लागतील. त्यादृष्टीने प्रयत्न  सुरु असल्याचे अधिक्षक अभियंता डी. टी. सायनेकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button