CoronaVirus: भारतातील ट्वेंटी-२० लीग रद्द, मे किंवा ऑक्टोबरमध्ये होणार सामने
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, ब्रेट ली आदी दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेली रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आयोजकांकडून याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. पण, याबाबत गुरुवारी आयोजकांनी तातडीची बैठक बोलावल्याचे वृत्त आहे.
आरोग्य मंत्रालयानं गर्दी टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचे उर्वरित सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला गेला होता. तसेच पुण्यातील सामने नवी मुंबईच्या डी वाय पाटीलला हलवले होते. त्यात संध्याकाळी ही स्पर्धाच रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर आयोजक ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करणार आहेत. या लीगचे उर्वरित सामने मे किंवा ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येतील. पण, खेळाडू कधी उपलब्ध आहेत, त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरण, मार्वन अटापट्टू आणि रंगना हेरथ यांनी भारत सोडला आहे. अन्य परदेशी खेळाडू येत्या दोन दिवसांत मायदेशात परततील, अशी माहिती आहे.