breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: बापरे! आठशेवेळा डायलिसिस करूनही कवी माधव पवार ‘कोरोनामुक्त’

दोन्ही मूत्रपिंड निकामे झाल्यामुळे मागील सात वर्षांपासून दर दोन-तीन दिवसांनी एकदा डायलिसिसचा उपचार करून घेताना शरीराची झालेली चाळण आणि होणाऱ्या असह्य वेदना यामुळे एरव्ही, कोणालाही आयुष्य जगणेच नकोसे वाटते. परंतु सोलापुरातील ज्येष्ठ कवी माधव पवार हे आतापर्यंत तब्बल आठशेवेळा डायलिसिस करूनही प्रबळ इच्छाशक्तीमुळे आनंदाने जीवन जगत असतानाच त्यांना करोना विषाणूने बाधित केले होते. परंतु तरीही त्यांनी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीला आनंदाने सामोरे जात करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

६५ वर्षांचे कवी माधव पवार हे महाराष्ट्रातील दिवंगत प्रसिध्द कवी, गीतकार रा. ना. पवार यांचे चिरंजीव आहेत. वडिलांपासूनच त्यांना काव्य, विनोद आणि नकलांचे बाळकडू मिळाले आहे. कवी म्हणून माधव पवार हे महाराष्ट्राला परिचित आहेत. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरीतून २०१३ साली निवृत्त होतानाच त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराने पछाडले. दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे नियमितपणे डायलिसिस करणे भाग पडले. आठवड्यातून दोन ते तीनवेळा डायलिसिसला सामोरे लागते. गेल्या सात वर्षात त्यांनी  तब्बल आठशेपेक्षा जास्त वेळा डायलिसिस करून घेतले आहे. यात त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली आहे. दररोज मूठभर कडवट औषधगोळ्या खाव्या लागतात. पुन्हा दर दोन-तीन दिवसांनी एकदा रूग्णालयात जाऊन डायलिसिस करावे लागते. जीवघेणे दुखणे सहन करण्याची क्षमताही हरण्याची वेळ येऊनदेखील माधव पवार यांची प्रबळ इच्छाशक्ती श्रेष्ठ ठरली आहे. निकामी मूत्रपिंडाचे दुखणे हसून सहन करणारे माधव पवार यांनी वेदनेशी जणू मैत्री केली आहे. कवितेवर प्रेम करणारे माधव पवार महाराष्ट्रात सतत भ्रमंतीही चालू असते. पत्नी चारूलता यांची साथ माधव पवारांना तेवढीच महत्त्वाची वाटते. मृत्यूशी संवाद साधणा-या कविता लिहिताना जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो. कविता हाच त्यांचा छंद आणि श्वास आहे.

गेली सात वर्षे डायलिसिसच्या जीवघेण्या उपचाराशी नाते जोडलेल्या माधव पवार यांना काही दिवसांपूर्वी ‘कोव्हिड १९’ची लागण झाली होती. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल केले असताना करोनासह डायलिसिसचा उपचारही झाला. वृध्दापकाळात अशक्त आणि थकलेल्या शरीराला करोना अधिक धोकादायक असतो. परंतु माधव पवार यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर करोनावरही मात केली आहे. त्यांना रूग्णालयातून घरी पाठविताना डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठीही हा चमत्कारिक अनुभव होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button