#CoronaVirus: कलीनामधील रुग्ण इटलीवरुन आलाय
कलीनामध्ये अढळून आलेला रुग्ण हा इटलीमधून आला आहे. इटलीमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. पालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपली चूक झाल्याचे मान्य केलं आहे. कलिना येथील झोपडपट्टीमध्ये राहणारा हा ३७ वर्षीय रुग्ण मार्च महिन्याच्या सुरुवातील भारतात परत आला तेव्हा पालिका अधिकाऱ्यांनी त्याला विलगीकरणामध्ये राहण्यास सांगितले होते. या व्यक्तीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती.
झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला विलगीकरणामध्ये राहता येईल का याची पहाणीही पालिका अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी जाऊन केली होती. “कलिनामधील झोपडपट्टीमध्ये हा रुग्ण राहतो. या झोपडपट्टीमध्ये २५ हजार लोकं राहतात. येथील प्रत्येक घरात पाणी येत नाही. येथील रहिवाशांना सार्वजनिक शौचालय वापरावे लागते,” अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. इटलीवरुन परत आलेल्या या व्यक्तीमध्ये काही दिवसांनी करोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची चाचणीही करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.