कोरोनाचा उद्रेक! आता ‘या’ शहरातही नाईट कर्फ्यू
मुंबई – देशात सध्या कोरोनाचा प्रसार अतिशय झपाट्याने होत आहे. त्यामुळे सर्व राज्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. आता महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातपाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारनेही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन लखनऊमध्ये नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. उत्तर प्रदेशात 24 तासांत 6,023 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महानगरपालिकेने 8 एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार 8 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान लखनऊ महानगरपालिका क्षेत्रात रात्री ९ ते सकाळी 6 या वेळेत नाईट कर्फ्यू असेल. तर कोविड प्रोटोकॉलसह सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत काम सुरू राहील. दरम्यान, नाईट कर्फ्यूमध्ये केवळ आवश्यक वस्तूच नेण्याची आणि आणण्याची परवानगी दिली जाईल. तसेच रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि विमानतळ येथे ये-जा करणारे लोक आपली तिकिटे दाखवू शकतील व माल गाड्यांच्या वाहतुकीवर कोणतेही बंधन येणार नाही. तर वैद्यकीय, नर्सिंग आणि पॅरा-वैद्यकीय संस्था वगळता सर्व सरकारी, खासगी शाळा आणि महाविद्यालये 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.