ताज्या घडामोडीमुंबई

करोना रुग्णाशी अनैसर्गिक चाळे केल्याचा आरोप; ‘त्या’ डॉक्टरला ठरवले निर्दोष

मुंबई | प्रतिनिधी

 करोना संकटाच्या पहिल्या लाटेच्या वेळी, करोनाचा संसर्ग असलेल्या पुरुष रुग्णावर पीपीई कीट घालून उपचार करत असताना त्याच्याशी लैंगिक चाळे केले, असा आरोप असलेल्या तरुण डॉक्टरला माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नुकतेच निर्दोष ठरवले. नेमके कोणते लैंगिक कृत्य केले आणि ते आरोपीनेच केले का, याचे कोणतेही तपशील तक्रारदाराने दिले नाहीत, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश प्रवीण मोदी यांनी आरोपी डॉक्टरला निर्दोष ठरवले.

आरोपी डॉक्टरने नवी मुंबईत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील खासगी रुग्णालयात ३० एप्रिल २०२० रोजी नोकरी पत्करली होती. त्याच रुग्णालयात मनुष्यबळ विकास विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदाराला करोनाची लक्षणे आढळल्याने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आरोपी डॉक्टरची त्या विभागात ड्युटी लागली होती. १ मे २०२० रोजी सकाळी तक्रारदाराची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेल्यानंतर डॉक्टरने तपासणीच्या नावाखाली त्याला असभ्य पद्धतीने स्पर्श केला आणि लैंगिक चाळे केले, असा आरोप होता. संबंधित घटनेनंतर तक्रारदाराने आरडाओरड केल्यावर रुग्णालयातील एक परिचारिका व दोन डॉक्टर धावत आले आणि त्यांनी प्रकरणाची चौकशी करण्याची कथित हमी दिली. तक्रारदाराने याप्रकरणी नंतर दिलेल्या लेखी तक्रारीप्रमाणे आग्रीपाडा पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा नोंदवला.

याप्रकरणी डॉक्टरला अटक झाल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. पोलिसांनी तक्रारदाराचा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवतानाच तपास पूर्ण करून ३१ ऑगस्ट २०२० रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र, आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीअंती निर्णयात स्पष्ट केले. ‘आरोपीने नेमके काय कृत्य केले, हे पीडित तक्रारदाराला सांगता आलेले नाही. घटनेच्या वेळी संबंधित डॉक्टरने पीपीई कीट घातले होते. त्यामुळे तो नेमका कोणता डॉक्टर होता, हे माहीत नाही, असे तक्रारदाराने न्यायालयातील साक्षीत सांगितले. मी गाढ झोपेत असताना व बरे वाटत नसताना डॉक्टरने आक्षेपार्ह रीतीने माझ्या शरीराला स्पर्श केला, असे तक्रारदाराने सांगितले. मात्र, नेमके आक्षेपार्ह काय, हे त्याला स्पष्ट करता आलेले नाही. आरोपी डॉक्टरची नेमकी ओळखही तक्रारदाराला करता आली नसेल. त्यामुळे पुरावे लक्षात घेता आरोपीनेच कथित कृत्य केल्याचा निष्कर्ष काढता येत नाही’, असे निरीक्षण न्यायाधीशांनी निर्णयात नोंदवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button