पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाने मृत्यूचे तांडव; अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा
- पारंपारिक पध्दतीने अंत्यविधी करण्यास महापालिका प्रशासनाचा निर्णय
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा विस्फोट होवू लागला आहे. दररोज कोरोना बाधिताने मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे शहरातील निगडी, सांगवी, भोसरी, चिंचवड, पिंपरी परिसरातील स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यू झालेल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना वेटींगला थांबावे लागत आहे.
दररोज शहरात कोरोना बाधितांची संख्या दोन हजारावर गेली आहे. त्याबरोबर कोरोनाने मृत्यू होणा-याची संख्याही वाढू लागली आहे. एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्हीटी दर १९.२२ तर मृत्यूदर १.५१ टक्के आहे. मागील काही दिवसांत 40 हून अधिक करोना बाधितांचा मृत्यू होत आहे.
एकीकडे कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना दुसरीकडे दिवस रात्र सुरू असलेल्या विद्युत दाहिन्यांवर ताण येत असून त्या बंद पडत आहेत. बुधवारी रात्री निगडी येथील दोनपैकी एक विद्युत दाहिनी बंद पडली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी तिथे तीन मृतदेह अंत्यविधीसाठी रांगेत होते. तर पिंपरी येथील दोनपैकी एक विद्युत दाहिनी गुरुवारी सकाळी बंद पडली. त्यावेळी अंत्यविधीसाठी सात मृतदेह रांगेत होते.
एका विद्युत दाहिनीत मृतदेहाचे दहन करण्यासाठी किमान दीड तासांचा वेळ लागतो. त्यामुळे सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारणतः साडेदहा तासांचा वेळ लागला. बंद पडलेली पिंपरीतील विद्युत दाहिनी सुरू करण्यासाठी महापालिकेचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आपल्या कुटूंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइक स्मशानभूमीत नंबर येण्याची वाट पाहात होते. त्यातील काही जणांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांनी काहीतरी खाऊन घ्यावे, यासाठी इतरजण प्रयत्न करीत होते. मात्र अंत्यसंस्कार झाल्याशिवाय खाणार नसल्याचे ते ठामपणे इतरांना सांगत होते. तर काहीच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. घरातील व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेत सोडून नातेवाइकांना नंबर येईपर्यंत जाताही येत नव्हते. त्यामुळे स्मशानभूमीत रुग्णवाहिकेच्या रांगा लागल्या होत्या.
पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार होणार
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा विस्फोट होवू लागला आहे. दररोज कोरोना बाधिताने मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे शहरातील निगडी, सांगवी, भोसरी, चिंचवड, पिंपरी परिसरातील स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यू झालेल्यावर अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईकांना वेटींगला थांबावे लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शवदाहिनी, विद्युतदाहिनीसह पारंपारिक पध्दतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अंत्यसंस्कार योग्य पध्दतीने होण्यासाठी प्रत्येक स्मशानभूमीवर 20 कामगार वाढवण्यात येणार आहेत. अशी माहिती शिरीष पोरेड्डी यांनी दिली.