breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘अनुराधा’च्या पोस्टरचा वाद पेटणार! महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांकडे तक्रार

मुंबई | प्रतिनिधी 
‘अनुराधा’ या प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या वेब सीरिजचा वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहेत म्हणजे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे या पोस्टरविषयी तक्रार करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये महिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन करण्यात आलं आहे असं तक्रारकर्त्यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे यासंदर्भातल्या अनेक तक्रारी आल्या आहेत असंही रूपाली चाकणकर यांनी ट्विट करून म्हटलं आहे. त्यामुळे आता अनुराधा या वेबसीरिजच्या पोस्टरचा वाद पेटणार अशीच चिन्हं आहेत.

काय म्हटलं आहे रूपाली चाकणकर यांनी?

एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत.संजय जाधव यांनाही रूपाली चाकणकरांनी सुनावलं आहे’अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून या अशा जाहिरातीच्या माध्यमातून स्त्रियांचे ओंगळवाणे प्रदर्शन करणे आणि व्यसनाधीनतेसाठी समाज प्रोत्साहित होईल अशा गोष्टींवर अंकुश लागणे गरजेचं आहे.’

काय आहे अनुराधा वेबसीरिज?

अनुराधा नावाची एक वेब सीरिज प्लॅनेट मराठी या OTT प्लॅटफॉर्मवर रिलिज झाली आहे. 10 डिसेंबरला ही सीरिज रिलिज करण्यात आली आहे. अनुराधा ही वेब सीरिज म्हणजे एक मर्डर मिस्ट्री आहे. या वेबसीरिजमध्ये अनुराधा ही मध्यवर्ती भूमिका तेजस्विनी पंडितने साकारली आहे. याशिवाय या वेब सीरिजमध्ये सचित पाटील, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, आस्ताद काळे, सोनाली खरे, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, वृषाली चव्हाण यांच्याही भूमिका आहे.

#BanLipstick हा ट्रेंड काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर होता. तो का हे अचानक नेटकऱ्यांना कळलं नव्हतं. मात्र अनुराधाचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी हा ट्रेंड प्रमोशनसाठी वापरला होता. या ट्रेंडचं सिक्रेट टिझर आल्यानंतर उलगडलं होतं. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडितने बोल्ड आणि ब्युटिफुल भूमिका साकारली आहे. माझा आत्तापर्यंतचा एकदम वेगळा अंदाज असं तिने भूमिकेबाबत म्हटलं आहे. अशात आता या वेबसीरिजच्या पोस्टरचा वाद पेटणार हेच दिसतंय.

काय आहे अनुराधाचं पोस्टर?

या पोस्टरमध्ये तेजस्विनी पंडित अत्यंत बोल्ड आणि मादक रूपात आहे. तिने हातात सिगरेट घेतली आहे. सिगरेटचा धूर आणि तिचे लाल लिपस्टिक लावलेले ओठ हे लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवरूनच वाद निर्माण झाला आहे. हे पोस्टर अनेक शहरांमध्ये अनेक भागात होर्डिंग्जच्या स्वरूपात लागले आहेत. बसवरही हे पोस्टर्स पाहण्यास मिळत आहेत. त्यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

अॅड. जयश्री पालवे म्हणतात ‘सध्ये हे पोस्टर सगळीकडे पाहवयास मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी असताना यामध्ये एका महिलेने अंगप्रदर्शन करत हातात पेटती सिगारेट घेतली आहे. महिलेचे असे ओंगळवाणे प्रदर्शन कितपत योग्य आहे? राज्य महिला आयोगाने याची नोंद घ्यावी.’

वेब सीरिज म्हटलं की त्यात बोल्ड कंटेट, शिव्या या आल्याच. मराठीतली ही पहिली बोल्ड वेबसीरिज आहे ज्यातही असे सीन आहेत त्याचप्रमाणे शिव्याही आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर या धाडसाचं कौतुकही केलं आहे. पण दुसरीकडे याच वेबसीरिजच्या पोस्टरवर टीकाही होते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button