breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आता दोन आणि पाच कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या कामांसाठीच सल्लागार, वास्तुविशारद

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत फुटकळ कामांसाठीही सल्लागारांच्या होत असलेल्या नेमणूकांबाबत टीका होऊ लागल्याने विविध विकास प्रकल्पाच्या कामांकरिता नियुक्त करण्यात आलेले सल्लागार व वास्तुविशारद यांचे जूने पॅनेल रद्द करण्यात आले आहे. यापुढे सल्लागाराची नेमणूक 5 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या कामांसाठी तर वास्तुविशारदांची नेमणूक 2 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कामांकरिताच केली जाणार आहे. नव्याने सल्लागार, वास्तुविशारदांची नेमणूक करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत छोट्या, मोठ्या कामांसाठीही सल्लागार नेमले जात होते. प्रत्येक विकासकामांसाठी सल्लागार, वास्तुविशारद नेमण्याचा धडाकाच लावला. पालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात असताना स्मशानभुमी बांधकाम, पुतळ्याचे सुशोभिकरण, पदपथ आणि फर्निचर बसविण्यासारख्या शुल्लक कामांसाठीही प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचे पेव फुटले आहे. महापालिका स्थायी समितीमार्फत ऐनवेळचे सल्लागार, वास्तुविशारद नेमण्याचे प्रस्ताव बिनबोभाट मंजुर केले जात होते. या सल्लागारांवर प्रकल्प रकमेच्या दोन ते तीन टक्के रूपयांची उधळपट्टी केली जात आहे.

विरोधकांसह नागरिकांकडून या नेमणूकांबाबत टीका होऊ लागल्याने विविध विकास प्रकल्पाच्या कामांकरिता नियुक्त करण्यात आलेले सल्लागार व वास्तुविशारद यांचे जूने पॅनेल महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आले आहे. नवीन पॅनलसाठी 5 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या कामांकरिता सल्लागार आणि 2 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कामांकरिता वास्तुविशारद यांची नव्याने नेमणूक केली जाणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कामाच्या प्रकारानुसार तीन वर्षासाठी ही नियुक्ती होणार आहे. त्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत.

‘या’ कामांसाठी नेमता येईल सल्लागार!

सल्लागारांची नेमणूक करताना इमारत बांधकाम, रस्ते बांधकाम, नदीवरील पूल, ग्रेडसेपरेटर, उड्डाणपुल, भुयारी मार्ग, लोहमार्गावरील पूल, पाणीपुरवठा व जल:निस्सारण, उद्यान विभागाअंतर्गत स्थापत्य, आर्कीटेक्ट किंवा हॉर्टीकल्चर संयुक्त उपक्रम, विद्युत, पर्यावरण विभागाअंतर्गत स्थापत्य किंवा पर्यावरण विशेषज्ञ, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन प्रकल्प असे कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच कामाच्या रकमेनुसार तीन श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 5 ते 20 कोटी, 20 ते 50 कोटी आणि 50 कोटींपुढील कामांचा समावेश असणार आहे.

वास्तुविशारदांची नेमणूक करताना इमारत व आंतरिक रचना किंवा आराखडा, उद्यान आणि लँण्डस्केपिंग, शहरी रस्त्यांची रचना किंवा आराखडा असे कामांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच कामाच्या रकमेनुसार चार श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 2 ते 5 कोटी, 5 ते 20 कोटी, 20 ते 50 कोटी आणि 50 कोटींपुढील कामांचा समावेश असणार आहे. सल्लागार किंवा वास्तुविशारदांना कोणत्याही प्रकार व श्रेणीमध्ये अर्ज करता येणार आहे. त्यांना या क्षेत्रातील कामाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button