breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

“काँग्रेसचा बुंधा सुकला आहे व वृक्ष निष्पर्ण,” शिवसेनेने स्पष्टच सांगितलं; म्हणाले “गांधींनी नेतृत्व सोडावे हे ठीक, पण…”

मुंबई |

काँग्रेससारखे पक्ष आजही परंपरांच्या शृंखलांत व जळमटात अडकून पडले आहेत. राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे भाजपाशी वेगळय़ा पद्धतीने लढावे लागेल. ‘जी 23’ गटात असा कोणी लढवय्या असेल तर त्यांनी दंड थोपटून पुढे यायला हरकत नाही, पण ते शक्य आहे असे वाटत नाही. काँग्रेसने बेगडी निधर्मीवादाचा ‘हिजाब’ दूर करायला हवा, हे पहिले व परिणामांची पर्वा न करता बिनकामाच्या पुढाऱयांना बाजूला केले पाहिजे असा सल्ला शिवसेनेने सामना अग्रलेखातून दिला आहे. पक्षाचे आणखी काय नुकसान व्हायचे राहिले आहे? अशी विचारणाही शिवसेनेने केली आहे. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींत डोके खुपसायची गरज नाही, पण समस्त विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा आणि एकजुटीचा विषय असल्यानेच आम्ही आमची मतं व्यक्त केली असंही शिवसेना म्हणाली आहे.

  • “गांधींनी नेतृत्व सोडावे हे ठीक”

“काँग्रेसचे नेतृत्व यापुढेही गांधी परिवारच करत राहील यावर काँग्रेस कार्यसमितीत शिक्कामोर्तब झाले आहे. पाच राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पंजाबात सत्ता होती ते एकमेव राज्यही काँग्रेसने गमावल्यावर नेहमीप्रमाणे पक्षातील ‘जी 23’ गटाने उचल खाल्ली. कपिल सिब्बल यांनी तर स्पष्टच सांगितले की, ‘काँग्रेसबाहेरील व्यक्तीने आता काँग्रेसचे नेतृत्व करावे.’ सिब्बल हे वकील आहेत व ते आपल्या अशिलाची बाजू चोखपणे मांडत असतात. या विषयात त्यांचा अशील कोण व ते कोणाची बाजू मांडत आहेत? गांधींनी नेतृत्व सोडावे हे ठीक, पण काँग्रेसला पुढे घेऊन जाणारा, जिंकून देणारा नेता त्यांच्या ‘जी 23’ गटात आहे काय?,” असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

  • “काँग्रेस नेते गांधी परिवाराची तारांबळ ‘एन्जॉय’ करीत होते”

“काँग्रेसच्या ताटातले आणि वाटीतले खाऊन-पिऊन अनेकदा ढेकर देऊन स्वस्थ झालेले नेते ‘जी 23’मध्ये आहेत व काँग्रेस पराभवाचा ते विलाप करीत आहेत. यापैकी किती नेते पाच राज्यांतील निवडणुकांत जमिनीवर उतरले होते? किती जणांनी प्रत्यक्ष प्रचारात झोकून दिले होते? पी. चिदंबरम, केसी वेणुगोपाल, सचिन पायलट, भूपेश बघेल असे काही मोजके नेते दिसत होते. प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशात होत्या. राहुल गांधी गोवा, उत्तराखंड, पंजाबात होते, पण गुलाम नबी, कपिल सिब्बल व 23 कॅरेटचे नेते या रणधुमाळीत कधी दिसले नाहीत. हे सर्व नेते बाहेर राहून गांधी परिवाराची तारांबळ ‘एन्जॉय’ करीत होते व मनोमन काँग्रेसच्या अपयशाची मनोकामना करीत होते असेच वाटते,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“हे खरे की, आता काँग्रेस पक्षाला नवी उभारी देणारे आणि नवा विचार रुजवून तरुणांना आकर्षित करणारे नेतृत्व हवे आहे. प्रियंका गांधांच्या उत्तर प्रदेशातील सभा आणि ‘रोड शो’ना चांगली गर्दी झाली, पण मतांच्या बाबतीत हाती काहीच लागले नाही. तेथील 404 आमदारांच्या विधानसभेत दोन जागा मिळाल्या. तसे पाहिले तर मायावतींना एकच जागा मिळाली. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाचे संघटन व कार्यकर्ते अजिबात राहिलेले नाहीत. निवडणूक लढण्याचे कौशल्य आणि व्यवस्थापन याबाबत काँग्रेसकडे दुष्काळ आहे. राहुल गांधी यांनी सत्य सांगितले आहे की, ‘‘निवडणुकीच्या मैदानात भाजपचा सामना करणे कठीण झाले आहे. भाजपवर टीका करणे, त्यांच्या एकाधिकारशाहीवर हल्ला करणे ठीक आहे. ते सुरूच राहील, पण आपल्याला पर्यायी नरेटिव्ह द्यावा लागेल. भाजप ज्या पद्धतीने व तयारीने निवडणुका लढवत आहे त्याचा मुकाबला आपण परंपरागत, जुनाट पद्धतीने करता येणार नाही. आपल्याला हे आव्हान वेगळय़ा पद्धतीने स्वीकारावे लागेल.’’ राहुल सांगतात त्याप्रमाणे हे आव्हान स्वीकारणारे कितीजण त्यांच्या आसपास आहेत?,” असं शिवसेनेने विचारलं आहे.

  • “जी 23’चा गट हा नासका आंबा”

“‘जी 23’चा गट हा नासका आंबा आहे, पण काँग्रेस संघटनेत आज जे आहेत व गांधीच पाहिजेत असे सांगणाऱयांच्या पायाखालची जमीनदेखील किती मजबूत आहे? उत्तराखंडात भाजपविरोधात जोरदार हवा होती. काँग्रेससाठी अनुकूल वातावरण होते. उत्तराखंडचे भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर धामी हे पराभूत झाले, पण उत्तराखंडात काँग्रेसने पुन्हा ज्या हरीश रावत याच पुरातन नेत्याकडे सूत्रे सोपवून भाजपला पुढची चाल दिली ते रावत स्वतःच निवडणूक हरले. रावत यांना दूर ठेवून निवडणूक लढवावी असे राहुल गांधींचे म्हणणे होते. तर श्री. रावत यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास उशीर केला असे दुसऱया गटाचे म्हणणे. रावत हे जुनेजाणते नेते आहेत, पण ते पराभूत झाले, हे सत्य आहे. पंजाबात कॅ. अमरिंदर यांनी थेट भाजपशीच हातमिळवणी केली. कॅ. अमरिंदर यांचे मन वळविण्यासाठी ‘जी 23’मधील किती जण पुढे आले? गोव्यात स्थानिक काँग्रेस नेत्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. काँग्रेस पक्षाचे संघटन जर्जर झाले आहे.

आकर्षण वाटावे असे नवे काहीच निर्माण होत नाही. राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे, पण मुख्यमंत्री गेहलोत हे अशा प्रकारे पाय पसरून बसले आहेत की नव्या कार्यकर्त्यांना बोट ठेवायला जागा नाही. भाजपच्या सायबर फौजा याआधी वातावरण निर्माण करतात. तसेच खोटे नरेटिव्ह निर्माण करतात. रक्ताचा थेंब न सांडता समोरच्याला हतबल व घायाळ करतात व मग भाजपचे पुढारी मैदानात उतरतात. त्यांचे हे उद्योग प. बंगालात व महाराष्ट्रात चालले नाहीत. केजरीवाल यांच्या पक्षापुढेही भाजपच्या या छुप्या फौजा हात टेकतात. अखिलेश यादव यांनीही उत्तर प्रदेशात भाजपला चांगले उत्तर दिले, पण काँग्रेस याबाबतीत मागे आहे. फक्त गांधी परिवार हेच एकमेव बलस्थान राहिलेले नाही. काँग्रेसचा बुंधा सुकला आहे व वृक्ष निष्पर्ण झाला आहे. पालवी फुटावी, बहर यावा, वातावरण ताजेतवाने व्हावे असे कोणाला मनापासून वाटत असेल तर झाडाची पूर्ण छाटणी करून नव्याने बगिचा फुलवावा लागेल,” असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

“भाजपच्या यशाचा डोलारा कृत्रिम आहे. कृत्रिम झाडे, कृत्रिम पाऊस, कृत्रिम गवत असा सर्व आधार आहे. ‘हिजाब’सारखी प्रकरणे उकरून काढणे, ‘कश्मीर फाईल्स’चा चित्रपटातून ‘प्रपोगंडा’ करणे असे प्रकार काँग्रेस किंवा अन्य पक्षांना आता जमायला हवेत. कश्मिरी पंडितांच्या पलायनामागचे सत्य वेगळेच आहे. केंद्रात भाजप पाठिंब्याचे व्ही. पी. सिंग सरकार होते व कश्मीरात भाजपचे प्रिय जगमोहन हे राज्यपाल असताना पंडितांना पलायन करावे लागले, हे सत्य समोर आणण्यात भाजपविरोधक तोकडे पडत आहेत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button