ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘राज ठाकरेंमुळे सरकारची पळता भुई थोडी, त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन’

अहमदनगर | ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे मंत्री आता मंदिरात दिसू लागले आहेत. पालख्या खांद्यावर घेताना दिसत आहेत. ठाकरे यांच्या भूमिकेमुळे आघाडी सरकारला पळता भुई थोडी झाली आहे,’ अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राज्यातील विविध मुद्द्यांवर विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिकडेच घेतलेल्या भूमिकेबद्दल विखे पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारमधील नेत्‍यांना आता जाग आली आहे. आतापर्यंत त्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटत होती. मात्र, भाजपाची या सर्व विषयांतील भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे. त्यामुळं भाजपला कोणाचा पुरस्कार करण्याची आवश्यकता नाही’, असंही विखे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करून विखे पाटील म्हणाले की, ‘यासंबंधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, मिटकरी अद्याप माफी मागायला तयार नाहीत. यावरूनच राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा उघड होतो. बेताल आरोप करण्‍याची राष्‍ट्रवादी काँग्रेसची परंपराच आहे. धर्मात आणि जातींबाबत वेगवेगळी मुक्‍ताफळं उधळायची आणि जेव्‍हा अंगावर येतं, तेव्‍हा क्षमा मागायची. एकानं मारल्या सारखं करायचं आणि दुसऱ्यानं माफी मागायची यासाठी राष्ट्रवादीनं बेताल वक्तव्य करण्यासाठी काही माणसं पुढं केली आहेत,’ असा आरोपही विखे पाटील यांनी केला.

पोलखोल अभियान सुरू करणार

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यानंतर देण्यात आलेली स्थगिती यावरून विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ‘नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्‍या पत्राचा अंगुली निर्देश थेट सरकारपर्यंत जात आहे. मात्र, त्‍यांची आता बदली करण्‍यात आली. त्यांनी महसूल विभागातील भ्रष्टाचारासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नांसंबंधी सरकार गप्प का आहे? या विरोधात आता भाजपतर्फे राज्यभर पोलखोल अभियान सुरू करण्यात येणार आहे. गरज पडल्यास न्यायालयातही जाऊ,’ असा इशाराही विखे पाटील यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button