breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

रायगडात शिक्षकांच्या लसीकरणाचा गोंधळ; आधी दुर्लक्ष आणि आता शिक्षकांना नोटिसा

रायगड |

रायगड जिल्हयात १ डिसेंबरपासून बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शिक्षकांच्या लसीकरणाबाबत शिक्षण विभागाचा सावळागोंधळ सुरू आहे. अनेक शिक्षकांचे लसीकरणच पूर्ण झाले नसल्याची बाब आता समोर आली आहे. सुरुवातीला शिक्षकांचे लसीकरण करण्याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले. मात्र आता शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यात शाळांचे निर्जंतुकीकरणाबरोबरच शिक्षकांचे कोविड लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी ही प्रमुख अट शाळा सुरू करण्यासाठी घातली आहे. या अटींच्या अधीन राहून रायगड जिल्ह््यातील २,६३७ पैकी २,४९७ शाळा सुरू झाल्या आहेत.

शाळा सुरू झाल्यानंतर याबाबतचा अहवाल रायगड जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाने तयार केला आहे. त्यानुसार ७ हजार १६३ शिक्षकांपैकी ७ हजार २५ शिक्षक शाळेत हजर झाले. त्यातील ६ हजार ६८४ शिक्षकांनी करोना प्रतिबंधक लशींचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ३ हजार ८२२ शिक्षकांनी पहिला डोस घेतला आहे. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार केवळ ६४ शिक्षकांनी लशीचा एकही डोस घेतलेला नाही. परंतु शिक्षण विभागाने दिलेली आकडेवारी फसवी आणि डोळ्यांत धूळफेक करणारी असल्याचे हा अहवालच सांगतो. त्यामध्ये एकूण शिक्षकांच्या संख्येपेक्षा लस घेतलेल्या शिक्षकांची संख्या खूपच अधिक दाखवण्यात आली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ही आकडेवारी पंचायत समिती स्तरावरून मागवलेली आहे. दुसरीकडे ज्या शाळा सुरू झालेल्या नाहीत त्यातील शिक्षकांच्या लसीकरणाची माहितीच शिक्षण विभागाकडे नाही. शिवाय त्या शाळा का सुरू होऊ शकल्या नाहीत याबाबतचे स्पष्टीकरणही शिक्षण विभागाकडून दिले जात नाही. त्यामुळे कोविड आजाराबाबत शिक्षण विभाग किती उदासीन आहे हे दिसून येत आहे.

राज्यात जानेवारी महिन्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात जिल्ह््यातील शिक्षकांचा मोठा सहभाग होता. असे असताना ११ महिन्यांनंतरही अनेक शिक्षक आजही लसीकरणापासून दूर असल्याचे चित्र रायगड जिल्ह््यात समोर आले आहे. आता लसीकरणापासून दूर आणि बेफिकीर असलेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाने नोटिसा बजावल्या आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या शिक्षकांना कारणांसह सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी आता स्पष्ट केले आहे.

  • शिक्षण विभागाची आकडेवारी

७ हजार ०२५ : शाळेत उपस्थित एकूण शिक्षकांची संख्या

६ हजार ६८४ : दोन्ही मात्रा घेतलेले शिक्षक

३ हजार ८२२: लसीची एक मात्रा घेतलेले शिक्षक

६४: लसीची एकही मात्रा न घेतलेले शिक्षक

ज्या शिक्षकांनी करोना प्रतिबंधात्मक लसीची एकही मात्रा घेतलेला नाही, तसेच ज्या शिक्षकांनी लसीची पहिली मात्रा घेतली पण दुसरी मात्रा मुदत उलटूनही घेतलेली नाही त्यांनी मात्रा घेणे बंधनकारक आहे. याबाबत शिक्षकांना सूचित करण्यात आले असून, जे शिक्षक लसीची मात्रा घेण्यास टाळाटाळ करतील त्यांच्याविरोधात उचित कार्यवाही करण्यात येईल.

– डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button