breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“अभ्यास करून मेरिटमध्ये ये, मग नोकरी मिळेल असं म्हणायचे दिवस संपले की काय?” बच्चू कडूंचा हल्लाबोल

मुंबई |

राज्याच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सडकून टीका केलीय. तसेच महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. “आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे ही परीक्षा पारदर्शीपणे व्हावी यासाठी ही परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी, अशी मागणी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलीय.

आरोग्य विभागाच्या परीक्षेचे काम न्यास या कंपनीला देण्यात आलेले आहे. न्यास ही कंपनी ब्लॅक लिस्ट आहे, तरीही याच कंपनीला काम का देण्यात आला? असा प्रश्न राज्यातील विद्यार्थ्यी विचारत आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील अशा कंपनीला काम देण्यात येऊ नये आणि राज्य सरकारने पारदर्शीपणे परीक्षा घ्यावी, अशी मागणी केलीय. सगळ्या जाती-धर्माचे विद्यार्थी रक्ताचे पाणी करून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करतात. त्यामुळे या परीक्षेत घोळ होऊ नये, असंही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.

  • “राज्याचं एकतरी काम अतिशय पारदर्शक झालं पाहिजे”

बच्चू कडू म्हणाले, “या सर्व परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडूनच घेतल्या पाहिजेत. खरंतर सर्व जाती-धर्मातील सामान्य गरीबांचे विद्यार्थी एवढी मेहनत घेतात. रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून बिचारे अभ्यास करतात, पण मागील २० ते ५० वर्षांचे या परीक्षांचे निकाल पाहिले तर तिथे गुणवत्तेवर येणारा विद्यार्थी फार कमी आहे ही शोकांतिका आहे. राज्याचं एकतरी काम अतिशय पारदर्शक झालं पाहिजे.”

  • “कुठलाही पैशाचा व्यवहार न होता आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत घ्या”

“राजेश टोपे यांच्याबद्दल आम्हाला कुठलाही संभ्रम नाही, पण या परीक्षेत मागेही घोळ झाला, परीक्षा रद्द झाली. अमरावतीवाल्याला नाशिक, नाशिकवाल्याला नांदेड हे जे काही घोळ झालेत ते निश्चितच दुर्दैवी आहेत. या परीक्षेत कुठलाही पैशाचा व्यवहार न होता एमपीएससी मार्फत या परीक्षा घेतल्या पाहिजे. असं केलं तरच गरीब गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल,” असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

  • “अभ्यास करून मेरिटमध्ये ये, मग नोकरी मिळेल असं म्हणायचे दिवस संपले की काय?”

बच्चू कडू यांनी यावेळी ब्लॅकलिस्ट कंपनीलाच आरोग्य भरतीचं काम देण्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “न्यास ही कंपनी ब्लॅकलिस्ट असताना देखील याच कंपनीला या परीक्षेचं काम देणं हे दुर्दैवी आहे. अशा कंपनीला काम देण्याचं कारण काय? या बद्दल माझ्या मनात खंत आहे. सर्व गरीब मुलांना हीच अपेक्षा असते की खूप अभ्यास करू आणि नोकरी मिळवू. आमच्याकडे जेव्हा नोकरीसाठी मुलं येतात तेव्हा आम्ही त्यांना अभ्यास कर मेरिटमध्ये ये असं सांगतो. मात्र, असे म्हणायचे दिवस संपले की काय अशी अवस्था आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button